ICC Women’s T20 World Cup: उपांत्य फेरीत भारताचं आव्हान संपुष्टात
आयसीसी 20-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने 8 विकेट राखून भारताला पराभवाची चव चाखवली. त्यामुळे भारतीय संघाला अनुभवी मिताली राज हिची उणीव जाणवली.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करताना सुरुवातीला भारतीय फलंदाज चाचपडले. स्मृती मानधना आणि तानिया भाटिया यांनी संघाला सकारात्मक सुरुवात करून दिली.
मानधना 23 चेंडूंत 34 धावा करत तंबूत परतत असताना त्यापाठोपाठ भाटियाही 11 धावा करून बाद झाली. हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्जला यांनी सुरुवातीला सावध खेळ केला. पण ही भागीदारी 36 धावांवर संपुष्टात आली. जेमिमा धावबाद झाली. 15 षटकांत भारताच्या 3 बाद 93 धावा झाल्या होत्या त्यानंतर सात फलंदाज अवघ्या 20 धावा जोडू शकल्या. भारताचा संघ 112 धावांवर तंबूत परतला. भारतीय महिलांना इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य उभे करण्यात अपयश आले.
इंग्लंडची सुरुवात फार चांगली झाली नाही. मात्र स्किव्हरचा झेल सोडणं भारताला महागात पडले. त्यानंतर स्किव्हर आणि ए जोन्स यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांच्या संयमी खेळीने भारतीय खेळाडूंच्या विजयाच्या आशा संपवल्या. हरमनप्रीतसह सर्व खेळाडू हतबत दिसत होते. या दोघींनी अगदी सहजतेने इंग्लंडचा विजय पक्का केला.