Sunday, May 10, 2026 08:52:10 PM

Palash Muchhal: संगीतकार पलाश मुच्छलवर सांगलीत गुन्हा दाखल; 'या' गंभीर आरोपांमुळे करण्यात आली कारवाई

सांगलीतील एका व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

palash muchhal संगीतकार पलाश मुच्छलवर सांगलीत गुन्हा दाखल या गंभीर आरोपांमुळे करण्यात आली कारवाई

Palash Muchhal: संगीतकार आणि गायक पलाश मुच्छल याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सांगलीतील एका व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रप्रकरणी विज्ञान प्रकाश माने (वय 34, रा. सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पलाश राजकुमार मुच्छल (वय 30, रा. अंधेरी, मुंबई) याच्यावर कारवाई केली आहे.

नेमके प्रकरण काय? चित्रपटाच्या नावाखाली 25 लाखांची गुंतवणूक
फिर्यादी विज्ञान माने हे सांगलीतील व्यापारी असून त्यांची पलाश मुच्छलशी एका समारंभात ओळख झाली होती. पलाशने 'नजरिया' नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याचे सांगून माने यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवले. 25 लाख रुपये गुंतवल्यास चित्रपट OTT वर प्रदर्शित झाल्यावर 12 लाख रुपये नफा आणि चित्रपटात अभिनयाची संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, माने यांनी सप्टेंबर 2024 मध्ये 20 लाख रुपये रोख आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने 5 लाख रुपये पलाशला दिले. मात्र, शुटिंगनंतर चित्रपटाबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने माने यांनी आपल्या पैशांची मागणी लावून धरली.

फार्म हाऊसवर जातीवाचक शिवीगाळ आणि अपमान
पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पलाश मुच्छलकडे विज्ञान माने यांनी वारंवार विचारणा केली. याच वादातून 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीतील एका फार्म हाऊसवर ही घटना घडली. आपले हक्काचे पैसे परत मागितले असता, पलाशने विज्ञान माने यांना जातीवरून हिणवून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारानंतर माने यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

हेही वाचा -  Beed Crime: बीड हादरलं! जन्मदात्या पित्यानेच चिमुकल्या मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवण्याचा केला प्रयत्न, संतापजनक कारण समोर

ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
सांगली शहर पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर पलाश मुच्छल विरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम (Atrocity Act) च्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत करत आहेत. मुंबईतील एका प्रसिद्ध कलाकारावर सांगलीत गुन्हा दाखल झाल्याने मनोरंजन आणि राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
 


सम्बन्धित सामग्री