Rajpal Yadav: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव फेब्रुवारी 2026 मध्ये सतत चर्चेत राहिला आहे. चेक बाऊन्स प्रकरणामुळे त्याला काही काळ दिल्लीच्या तिहार तुरुंगात घालवावा लागला होता. तथापि, दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला 18 मार्च 2026 पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्याने त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपालने आपल्या भाचीच्या लग्नाचा आनंद साजरा केला आणि आता आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी उत्पन्नाचा एक नवीन मार्ग शोधला आहे. राजपालने स्वतः एका व्हिडिओद्वारे या नवीन उपक्रमाची माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे.
राजपाल यादवचा नवा प्रवास; आता दिसणार 'युट्यूबर'च्या भूमिकेत
राजपाल यादवने शनिवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत डिजिटल विश्वात प्रवेश केल्याची घोषणा केली. त्याने स्वतःचे अधिकृत युट्यूब चॅनेल लाँच केले असून त्याचे नाव "राजपाल नौरंग यादव" असे ठेवले आहे. "एक नवीन सुरुवात, एक नवीन प्रवास," अशा कॅप्शनसह त्याने चाहत्यांना चॅनेल सबस्क्राइब करण्याचे आवाहन केले आहे. या चॅनेलवर प्रेक्षकांना केवळ कॉमेडीच नाही, तर ट्रॅव्हल व्हीलॉग, मिनी-सिरीज आणि चित्रपटांच्या पडद्यामागील (BTS) रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
"तुमच्या प्रेमाची गरज आहे" - राजपालची भावनिक साद
आपल्या व्हिडिओमध्ये राजपाल यादव अत्यंत उत्साहात दिसत असून तो म्हणतो, "मित्रांनो, मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की मी बऱ्याच काळापासून एका नवीन इनिंगची तयारी करत होतो. आता तो शुभ क्षण आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांकडून मला नेहमीच प्रचंड प्रेम मिळाले आहे. आता या युट्यूब चॅनेलद्वारे मी तुमच्याशी अधिक जवळून जोडला जाईन. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच कायम ठेवा." राजपालच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून, अनेकांनी त्याला या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - Thalapathy Vijay Divorce: थलापती विजयचा 27 वर्षांचा संसार मोडला; पत्नी संगीताने न्यायालयात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज
चेक बाऊन्स प्रकरण आणि कायदेशीर स्थिती
राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात शरण जावे लागले होते. तिथे 12 रात्री घालवल्यानंतर, 17 फेब्रुवारी रोजी कडकडुमा न्यायालयाने रिलीज वॉरंट जारी केले आणि त्याची सुटका झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. या कायदेशीर कचाट्यातून बाहेर पडत असतानाच राजपालने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच तो अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' आणि बहुप्रतिक्षित 'वेलकम टू द जंगल' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल.