Rashmika-Vijay Visit TTD Temple: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकं जोडपं रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे या जोडीचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याने आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराला भेट देऊन देवाचे आशीर्वाद घेतले. यादरम्यानचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दोन संस्कृतींचा अनोखा संगम
रश्मिका आणि विजय यांचा विवाहसोहळा अत्यंत खास होता. त्यांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परंपरांनुसार लग्न केले. सकाळी विजयच्या कुटुंबियांच्या परंपरेनुसार 'तेलगू' पद्धतीने, तर संध्याकाळी रश्मिकाच्या मूळ कुर्ग (कर्नाटक) वारशाचा सन्मान करत 'कोडावा' पद्धतीने हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा आणि 'नो फोन' पॉलिसी लागू करण्यात आली होती, जेणेकरून खाजगीपण जपले जाईल.
विक्रमी सोशल मीडिया प्रतिसाद
लग्नानंतर रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर नवा इतिहास रचला आहे. अवघ्या 48 तासांत या पोस्टला 24 दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले. यासह रश्मिकाने क्रिकेटपटू विराट कोहलीचा टी-20 विश्वचषक विजयानंतरच्या पोस्टचा (22.9 दशलक्ष लाईक्स) विक्रम मोडीत काढला आहे. सध्या रश्मिकाची ही पोस्ट भारतातील सर्वात जास्त लाईक केलेली इंस्टाग्राम पोस्ट ठरली आहे.
देशभरात मिठाईचे ट्रक आणि 16 मंदिरांत अन्नदान
केवळ स्वतः आनंद साजरा न करता, या जोडप्याने आपल्या लग्नाचा आनंद चाहत्यांसोबत अनोख्या पद्धतीने वाटला. "भारत प्रत्येक गोष्ट मिठाई आणि अन्नाने साजरी करतो," असा संदेश देत त्यांनी कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह अनेक राज्यांतील 16 प्रसिद्ध मंदिरांमध्ये 'अन्नदान' आयोजित केले. यामध्ये बंगळुरूमधील शिवोहम मंदिर आणि वृंदावनमधील कृष्ण बलराम मंदिराचा समावेश आहे. तसेच ठिकठिकाणी मिठाईचे ट्रक पाठवून त्यांनी चाहत्यांचे तोंड गोड केले.
हेही वाचा - Mamta Kulkarni: संन्यास की प्रसिद्धीचा खेळ? अभिनेत्री ममता कुलकर्णीचा 25 वर्षांनंतर अचानक कमबॅक; कलर्स हिंदीच्या 'या' प्रसिद्ध शोमध्ये करणार काम
चित्रपटसृष्टीसाठी भव्य रिसेप्शन
लग्नाचे खाजगी विधी उरकल्यानंतर आता 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार आणि दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. लग्नाच्या या गोड बातमीनंतर चाहते आता त्यांच्या आगामी 'राणाबाली' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामध्ये ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.