Dhurandhar 2 Teaser Release: धुरंधर' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या 'धुरंधर 2' चा अधिकृत टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी सोशल मीडियावर हा टीझर शेअर करताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 मिनिट 12 सेकंदांचा हा व्हिडिओ केवळ टीझर नसून एक 'बॉम्ब' असल्याची भावना प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
रणवीर सिंगचा क्रूर अवतार आणि 'नवा भारत'
टीझरची सुरुवात अत्यंत भयावह असून त्यात रणवीर सिंग एका अत्यंत शक्तिशाली आणि धोकादायक रूपात दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये जबरदस्त ॲक्शन आणि गोळीबार दाखवण्यात आला असला, तरी यात कोणताही संवाद नाही. मात्र, टीझरच्या शेवटी रणवीर सिंगने दिलेला संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. "हा नवा भारत आहे, तो घरात घुसून मारेल," हा त्याचा संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा - Rashmika - Vijay : रश्मिका - विजय यांचं लग्न आज?; पाहा तयारीचा व्हायरल व्हिडिओ
टीझर पाच भाषांमध्ये प्रदर्शित
निर्मात्यांनी हा टीझर हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात 'हमजा' नावाच्या पात्राचा राग आणि रणवीरचा भयंकर लूक कथानकाला वेगळ्या उंचीवर नेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. चित्रपटात रणवीर सिंगसोबत आर. माधवन आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
टीझर पाहून युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने म्हटले की, "हा टीझर नाही, तर बॉम्ब आहे," तर दुसऱ्याने "हा चित्रपट नाही तर एक चळवळ असून 2000 कोटींचे लोडिंग सुरू झाले आहे," अशा शब्दांत आनंद व्यक्त केला आहे. विशेषतः टीझरमधील शेवटच्या संवादाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर
'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या संघर्षाला सामोरे जाणार आहे. 'धुरंधर 2' ची टक्कर सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' आणि आदिवी शेष-मृणाल ठाकूर यांच्या 'डकैत' या चित्रपटांशी होणार आहे.