Rajpal Yadav : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सुमारे 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 'चेक बाऊन्स' प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्यावर कडक ताशेरे ओढले असून, त्याला येत्या 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत तुरुंग अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण (Surrender) करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
राजपाल यादव याने 2010 मध्ये इंदूरमधील सुरेंद्र सिंह यांच्याकडून 'मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स' अंतर्गत 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज फेडण्यास तो अपयशी ठरला. 2015 मध्ये त्याने दिलेला ॲक्सिस बँकेचा चेक खात्यात पैसे नसल्याने बाद झाला. जिल्हा न्यायालयाने वारंवार समझोता करण्याची संधी देऊनही राजपालने कर्जाची परतफेड केली नाही. न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजपालने वारंवार दिलेली आश्वासने मोडली असून हे न्यायालयाच्या अवमानासारखे आहे.
"कामात व्यस्त असणे हे निमित्त होऊ शकत नाही"
दरम्यान, 2 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांनी राजपालच्या वर्तनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. राजपाल सध्या मुंबईत शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्याला दिलासा मिळावा, अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. मात्र, "व्यावसायिक कामात व्यस्त असणे हे न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवण्याचे कारण असू शकत नाही," असे म्हणत न्यायालयाने सवलत देण्यास स्पष्ट नकार दिला.
हेही वाचा - Dhurandhar 2 Teaser Release: 'धुरंधर 2' चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज; रणवीर सिंगचा भयंकर अवतार अन् 'तो' संवाद ठरतोय चर्चेचा विषय
6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा कायम
यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने (Trial Court) राजपाल आणि त्याच्या पत्नीला दोषी ठरवत 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती, मात्र वारंवार संधी देऊनही पैसे न भरल्याने आता न्यायालयाने राजपालला ही शिक्षा पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट'च्या कलम 138 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.