Abhishek Bachchan Expresses About Aaradhya : नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीतअभिषेक बच्चन त्याची मुलगी आराध्या बच्चनबद्दल बोलताना बाप-लेकीच्या नात्याविषयी मनापासून बोलला. आराध्याचा त्याच्या आयुष्यात काय रोल आहे त्याबद्दल त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याचा नवीन चित्रपट 'बी हॅप्पी' मध्ये तो एका मुलीच्या वडिलांची भूमिका करताना दिसत आहे. त्यावरूनच त्याला त्याच्या लेकीबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. चला, जाणून घेऊ, अभिषेक त्याच्या लाडक्या लेकीबद्दल काय म्हणाला?
काही काळापूर्वी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, त्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये ही जोडी एकत्र दिल्यानंतर मात्र त्यांच्याबद्दलच्या घटस्फोटाच्या अफवांचं पीक कमी झालंय. दरम्यान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या जीवनसाथी म्हणून एकमेकांना साथ देतातच. शिवाय, दोघेही पालक म्हणून आपापली जबाबदारी नेहमी पार पाडताना दिसतात.
हेही वाचा - 'या' गंभीर आजारात हातपाय उचलणे देखील होते कठीण; अभिनेता विकी कौशलही गेलाय यातून..
अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांची लेक आराध्यासाठी सर्व काही करताना दिसतात. मुख्यत: आराध्या ऐश्वर्यासोबतच दिसून येते. ऐश्वर्या राय ही लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत कायमच विविध ठिकाणी जात असते. पण अभिषेकही लेकीच्या आनंदासाठी बऱ्याचदा गोष्टी करताना दिसतो. आता लेकीबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे अभिषेक बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'बी हॅप्पी' चित्रपटाबद्दल बोललं जात आहे. सध्या अभिषेक आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतोय. त्याविषयी बोलताना त्याने आराध्याचा उल्लेख केला.
आराध्याबद्दल काय म्हणाला अभिषेक
या चित्रपटाच्या निमित्ताने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तो नुकताच आराध्याबद्दल बोलला. अभिषेक म्हणाला की, “एखादी चित्रपटातली भूमिका साकारताना ती भूमिका खऱ्या आयुष्यातील खऱ्या व्यक्तीशी जोडली तर ती भूमिका वठवणं अधिक सोप्पं जातं.” अभिषेक पुढे म्हणाला, “आराध्याने नकळतपणे मला या चित्रपटात चांगला अभिनय करण्यासाठी मदत केली आहे.” तो पुढे म्हणाला की, पालकांनी मुलांसाठी मार्गदर्शक आणि संरक्षक असलं पाहिजे. पण मुलांसोबत मित्र-मैत्रिणींप्रमाणेही राहिलं पाहिजे. सध्याच्या या चित्रपटात मी वडील आणि मुलीचे नाते पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
'आईने मुलांसाठी काय केलं हे नेहमी लक्षात ठेवलं जातं. पण वडिलांनी काय केलं, ते मुलांसाठी कोणत्या परिस्थितीतून गेले किंवा जात आहेत, हे आपण विसरून जातो. पुरुष सर्वसाधारणपणे आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करू शकत नाहीत. ही खरं तर त्यांच्यातली एक कमतरता आहे. त्यांना वाटते, त्यांनी सर्व काही गुपचुपपणे सहन केले पाहिजे. आई जे मुलांसाठी करते, त्याच्याशीकोणीच तुलना करू शकत नाही, पण वडिलही त्यांच्या परीने मुलांसाठी सर्व प्रयत्न करत असतात, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे,' असं अभिषेक पुढे म्हणाला.
अभिषेक ‘बी हॅप्पी’ या चित्रपटात एका लहान मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत
अभिषेक ‘बी हॅप्पी’ या चित्रपटात एका मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिषेक याने पहिल्यांदाच त्याची लेक आराध्याबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. ‘बी हॅप्पी’ चित्रपटात इनायत वर्मा आणि नोरा फतेही देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हेही वाचा - 'गाडीचा एसी चालत नव्हता… कुलिंगऐवजी त्यातून गरम वाफा..' अभिनेता ऋतुराज फडकेने शेअर केला शिवशाही बसमधला अनुभव
पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे कायमच आराध्याची काळजी घेताना दिसतात तिच्या शाळेतील कार्यक्रमांना हजेरी लावतात. तसेच तिच्याबाबतीत कोणत्याही अफवा पसरू नये याचीही ही दोघं पालक म्हणून नेहमी काळजी घेताना दिसतात. नुकतेच अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या एका सुट्टीवरून परतले. तेव्हा विमानतळावरचा त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये असणारे वाद किंवा त्यांच्यातील तणाव याबद्दल नेमकं काय सत्य आहे, हे सांगणं कठीण असलं तरीही ते पालक म्हणून आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट आणि एकत्रितपणे पार पाडताना दिसतात. यामुळे अनेकजण त्यांचं कौतुक करत आहेत.