Saturday, March 07, 2026 01:44:56 AM

Rajpal Yadav Surrender: अभिनेता राजपाल यादव अखेर गजाआड; चेक बाऊन्सप्रकरणी केलं आत्मसमर्पण, तिहार तुरुंगात रवानगी

दिल्ली उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर, गुरुवारी 5 फेब्रुवारी 2026 रोजी राजपाल यादव यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले.

rajpal yadav surrender अभिनेता राजपाल यादव अखेर गजाआड चेक बाऊन्सप्रकरणी केलं आत्मसमर्पण तिहार तुरुंगात रवानगी

Rajpal Yadav Surrender: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारे प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तब्बल 15 वर्षांपासून सुरू असलेल्या एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर, गुरुवारी 5 फेब्रुवारी 2026 रोजी राजपाल यादव यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले. न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

शेवटच्या क्षणी 25 लाखांचा धनादेश, पण न्यायालयाचा नकार
दरम्यान, गुरुवारी दुपारी 4 वाजता राजपाल यादव यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी तुरुंग गाठले. त्यापूर्वी त्यांनी न्यायालयासमोर शेवटची विनंती केली होती. त्यांनी 25 लाख रुपयांचा धनादेश सादर करत उर्वरित रकमेसाठी मुदतवाढ मागितली होती. मात्र, न्यायाधीश स्वरण कांता शर्मा यांनी ही विनंती फेटाळून लावत स्पष्ट केले की, कोणत्याही अर्जावर विचार करण्यापूर्वी आरोपीने आत्मसमर्पण करणे अनिवार्य आहे. न्यायालयाने नमूद केले की, तक्रारदारासोबत तडजोड करण्यासाठी वारंवार संधी देऊनही अभिनेत्याने त्याचे आश्वासन पूर्ण केले नाही.

हेही वााचा - Rohit Shetty Firing Case: रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबारासाठी कुणी पुरवले शस्त्र? मुंबई गुन्हे शाखेचा मोठा गौप्यस्फोट

नेमकं काय आहे प्रकरण?
हे प्रकरण 2010 मधील असून, राजपाल यादव यांनी त्यांच्या दिग्दर्शनातील पदार्पण असलेला चित्रपट 'आता पता लपता' साठी मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे कर्जाची परतफेड रखडली. कंपनीला दिलेले अनेक चेक बाऊन्स झाल्यामुळे त्यांच्यावर 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट'च्या कलम 138 अंतर्गत खटला भरण्यात आला होता. याआधी 2013 मध्येही त्यांना काही दिवस तुरुंगात घालवावे लागले होते.

न्यायालयाच्या विश्वासाचा भंग करणे पडले महागात
कनिष्ठ न्यायालयाने राजपाल यादव यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयात मध्यस्थी दरम्यान त्यांनी 2.5 कोटी रुपये भरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ठरलेल्या मुदती उलटून गेल्यावरही रक्कम जमा न झाल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला. जानेवारी 2016 मध्ये त्यांना दिलेली शेवटची संधीही वाया गेल्याने, न्यायमूर्तींनी "वारंवार आश्वासनांचे उल्लंघन करणे अत्यंत गंभीर आहे" असे ताशेरे ओढत त्यांना थेट कोठडीचे आदेश दिले.
 


सम्बन्धित सामग्री