मुंबई: झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी मराठमोळी अभिनेत्री अनिता दाते केळकर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'तुंबाड' तसेच 'वाळवी' या चित्रपटांत काम केल्यानंतर अनिता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, ज्याचं नाव आहे 'जारण'.
हेही वाचा: 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे'चे पुरस्कार जाहीर; नीना कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार
अनीज बझमी प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'जारण' हा चित्रपट 6 जून रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. अमोल भगत आणि नितीन भालचंद्र यांनी 'जारण' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अंधश्रद्धा, काळी जादू, मारण, वशीकरण आणि आभास या सर्वांनी भरलेला हा चित्रपट कसा असेल? चित्रपटाची कथा तसेच प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहावा? 'जारण' या चित्रपटातील चांगल्या आणि वाईट अशा सर्व बाजू आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
अशी आहे 'या' चित्रपटाची कथा:
'जारण' ही कथा राधा (अमृता सुभाष) नावाच्या एका स्त्रीच्या अवतीभवती फिरते. एक स्त्री जी तिच्या सभोवतालच्या जगामुळे, तिच्या स्वप्नांमुळे आणि तिच्या स्वतःच्या असंतुलित मनामुळे खचलेली आहे. लहानपणी, त्यांच्या भाड्याच्या घरात राहणारी गंगुतीने (अनिता दाते केळकर) तिच्या डोळ्यासमोर 'जारण' नामक काळी जादू केलेली असते. गंगुतीचे 'मारक' शब्द राधाच्या बालमनावर खोलवर रुजतात. देवाच्या कृपेने आणि वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर ती तात्पुरती बरी होते. पण, बऱ्याच वर्षांनंतर, जेव्हा राधाचा संसार सुरू होतो, ज्यामध्ये तिचा नवरा, मुलगी आणि ती स्वतः असते, तेव्हा अचानक तिच्या आयुष्यात एक वेगळीच ट्विस्ट येते आणि ते म्हणजे 'जारण' पुन्हा राधाच्या आयुष्यात डोकावू लागते, याचं कारण म्हणजे तेव्हा एक असा अपघात होतो ज्यामुळे 'जारण'च्या विळख्यात राधा हळूहळू अडकत जाते.
या दरम्यान, तो भूतकाळही आपल्यासमोर येतो आणि तेव्हा आपल्याला गंगुतीची कथा समजते. एक अशी कथा, जी फक्त अंगावर शहारेच नाही आणत, तर आपल्या सभोवतालच्या अंधश्रद्धांनी भरलेल्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करते. सुरुवातीला थोडा संथ वाटणारा हा चित्रपट दुसऱ्या भागात वेग पकडतो. आणि क्लायमॅक्सला अंधश्रद्धेच्या आणि मानसिक भासांच्या एका भेदक जाळ्यात अडकून ठेवतो. लेखक आणि दिग्दर्शकाने चित्रपटाच्या पहिल्या भागात सूक्ष्म संकेत आणि दृश्यांचा हुशारीने वापर केला आहे. संवादातून काही संकेतही दिले आहेत. उत्तरार्धात त्यांचे अर्थ विलक्षण तीव्रतेने स्पष्ट होतात.
'हे' आहेत चित्रपटातील मुख्य कलाकार:
अमृता सुभाष, अनिता दाते केळकर या मुख्य भूमिकेत आहेत तर ज्योती मालशे, सीमा देशमुख, राजन भिसे, बालकलाकार अवनी जोशी, आणि विक्रम गायकवाड हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. अभिनेत्री अमृता सुभाष यांनी बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर 'जारण' या मराठी चित्रपटातून कमबॅक केला आहे. तसेच, 'तुंबाड' सारख्या गुढ आणि रहस्यमयी चित्रपटात काम केल्यामुळे अनिता दाते केळकर यांना गंगुतीची भूमिका साकारणं फारसं अवघड नाही गेले.