अहिल्यानगर : महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ‘अहिल्यानगर महाकरंडक २०२५’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा येत्या १६ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेचे १२वे वर्ष आहे आणि गेल्या ११ वर्षांपासून 'अहमदनगर महाकरंडक' म्हणून ओळखली जात असलेली ही स्पर्धा आता 'अहिल्यानगर महाकरंडक' नावाने ओळखली जाईल.
स्पर्धेचे ब्रीदवाक्य 'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ठेवण्यात आले आहे, कारण यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होणार आहेत. अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन आणि श्री महावीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे, तर झी युवा वाहिनी या स्पर्धेचा प्रायोजक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
या स्पर्धेने अनेक मोठ्या कलावंतांना व्यासपीठ दिले असून, अनेक कलाकारांनी या स्पर्धेत भाग घेऊन चित्रपट, मालिका आणि ओटीटी माध्यमांत आपले स्थान निर्माण केले आहे. स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील बिग बॉस अभिनेते महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी आणि इतर प्रसिद्ध कलाकार आणि निर्माते उपस्थित राहणार आहेत. यावर्षी स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघाला ₹ १,५१,१११/- रुपये रोख पारितोषिक आणि अहिल्यानगर महाकरंडक प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेतील आकर्षक बक्षिसे आणि शानदार आयोजनामुळे 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यातील एकांकिकांसाठी एक महत्त्वपूर्ण मंच बनला आहे.
हे देखील वाचा : पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला कौतुकाची थाप