मुंबई: राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांना मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळायची इच्छा असतेच. पण अजित पवार यांच्या गटाचे आक्रमक आणि स्पष्टवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी आता थेट गृहमंत्रिपद गाठलं आहे तेही रुपेरी पडद्यावर होय, मिटकरी लवकरच एका मराठी चित्रपटात महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून झळकणार आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची ही फिल्मी इनिंग चर्चेचा विषय बनली आहे.
‘बिल्लोरी’ या आगामी मराठी चित्रपटात अमोल मिटकरी गृहमंत्र्याची भूमिका साकारत आहेत. सदगुरु इंटरप्रायझेस प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील शिरसाठ यांनी केले असून, नुकताच अकोल्यात या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. मिटकरी हे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत असून, त्यांच्या नव्या लूकची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, 'चित्रपटात तरी मी गृहमंत्री झालो आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यातही अशी संधी मिळाली तर ती जबाबदारी पार पाडायला मला आनंदच होईल.' त्यांनी पुढे नमूद केले की, 'एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणून अजितदादांनी मला आमदार केलं, हेच माझ्यासाठी मोठं पद आहे.' त्यांच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित श्रोत्यांच्या मनात विशेष आदर निर्माण झाला.
राजकारणातील आक्रमक भाष्यांसाठी ओळखले जाणारे मिटकरी आता रुपेरी पडद्यावर नवा अवतार घेऊन येत आहेत. त्यांनी साकारलेली गृहमंत्र्याची व्यक्तिरेखा कितपत प्रभाव टाकते, हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एकंदरीत, सिनेसृष्टीत अमोल मिटकरींची ही एन्ट्री त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे.