Arjun Rampal Injured: राणा दग्गुबाती आणि वेंकटेश यांच्या 'राणा नायडू 2' या सिरिजच्या रिलीजची घोषणा सोमवारी करण्यात आली. यादरम्यान, चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल देखील सहभागी झाला. नेटफ्लिक्सने मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या आगामी चित्रपटांची आणि सिरिजची घोषणा केली. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन रामपालच्या हातातून रक्त वाहत असल्याचे दिसून येतं आहे.
कार्यक्रमात अर्जुन रामपालने काचेची चौकट तोडून स्टेजवर भव्य एन्ट्री केली. यादरम्यान, त्याच्या हाताला दुखापत झाली आणि त्यातून रक्त येऊ लागले. बोटांमधून रक्त येत असतानाही, त्याने कार्यक्रमाला हसतमुखाने उपस्थिती लावली.
तांत्रिक कारणांमुळे काच फुटली नाही -
काही तांत्रिक अडचणींमुळे अभिनेत्याची एँट्री करताना बसवलेली काच नीट तुटली नाही, त्यामुळे अर्जुन रामपालने ती स्वतःच्या हातांनी फोडली. त्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अर्जुन रामपालच्या व्हिडिओमध्ये त्याच्या हातातून रक्त येत असल्याचे दिसून येत आहे. स्टंट दरम्यान, अभिनेत्याच्या बोटात काचेचे तुकडे घुसले, ज्यामुळे त्याच्या बोटातून रक्त येऊ लागले.
सोमवारी सिरिजच्या दुसऱ्या सीझनच्या घोषणेसोबतच त्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला. नेटफ्लिक्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आता विनाश सुरू होईल मामू, कारण ही राणा नायडूची शैली आहे. 2025 मध्ये येणारा 'राणा नायडू सीझन 2' फक्त नेटफ्लिक्सवर पहा.' तथापि, चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा अद्याप झालेली नाही. या सिरिजमध्ये सुचित्रा पिल्लई, अभिषेक बॅनर्जी, गौरव चोप्रा, सुरवीन चावला, इशिता अरुण आणि कृती खरबंदा यांच्याही भूमिका आहेत.