मुंबई : महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये आयोजित नाट्यप्रयोग किंवा इतर कार्यक्रम निर्धारित वेळेपेक्षा उशिरा संपल्यास आता दंड भरावा लागणार आहे. महापालिकेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, कार्यक्रम वेळेत न संपल्यास प्रत्येक अतिरिक्त अर्ध्या तासासाठी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नाट्यनिर्मात्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
महापालिकेने जुलै ते सप्टेंबर महिन्यांसाठी नाट्यगृहे देताना काही नव्या अटी लागू केल्या आहेत. त्यामध्ये 'प्रयोग कधीही सुरू झाला तरी तो निर्धारित वेळेत संपवावा' ही अट सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. परंतु अनेक नाट्यनिर्मात्यांचे म्हणणे आहे की, मुंबईसारख्या शहरात वाहतुकीमुळे प्रेक्षक वेळेवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात सवलत दिली जावी, अशी त्यांची मागणी आहे.
हेही वाचा: स्मशानातील सोनं आणि अस्थी गायब झाल्याने खळबळ; नाशिकच्या नामपूरमध्ये धक्कादायक घटना
या पार्श्वभूमीवर जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने महापालिकेचे उपायुक्त अजितकुमार अंबी यांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. संघाचे सहकार्यवाह दिलीप जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे की, 'महापालिकेची नाट्यगृहे ही व्यावसायिक उद्देशाने चालवली जात नाहीत. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी असा दंड आकारणे योग्य नाही. उलट प्रेक्षक आणि निर्मात्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.'
महापालिकेच्या या निर्णयामुळे अनेक प्रख्यात नाट्यसंस्थांनीही चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे नाट्यकलेला चालना देण्याच्या चर्चा होत असताना, दुसरीकडे अशा निर्बंधांमुळे नाटकाच्या वेळा कमी कराव्या लागतील, जे निर्मात्यांसाठी अडचणीचे ठरू शकते.
दरम्यान, उपायुक्त अंबी यांनी सांगितले की, नाट्यनिर्मात्यांनी व्यक्त केलेल्या अडचणी गांभीर्याने घेतल्या जातील. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून, योग्य निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आता पालिकेचा पुढील निर्णय काय असतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.