Thursday, February 12, 2026 07:10:26 PM

Border 2 Shows Cancelled: 'बॉर्डर 2' ला प्रदर्शनाच्या दिवशीच मोठा धक्का; 'या' कारणामुळे देशभरातील मॉर्निंग शो रद्द

चित्रपटगृहाबाहेर पहाटेपासून गर्दी केलेल्या चाहत्यांना निराश होऊन घरी परतावे लागले. तथापि, ही समस्या तात्पुरती असून लवकरच स्क्रीनिंग पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन प्रदर्शकांनी दिले आहे.

border 2 shows cancelled बॉर्डर 2 ला प्रदर्शनाच्या दिवशीच मोठा धक्का या कारणामुळे देशभरातील मॉर्निंग शो रद्द

Border 2 Shows Cancelled:  सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर 2' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच, आज 23 जानेवारी रोजी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला मोठा धक्का बसला आहे. तांत्रिक कारणास्तव कंटेंट डिलिव्हरीमध्ये विलंब झाल्यामुळे देशाच्या अनेक भागांतील सकाळी 7:30 आणि 8:00 वाजताचे मॉर्निंग शो रद्द करण्यात आले आहेत. यामुळे चित्रपटगृहाबाहेर पहाटेपासून गर्दी केलेल्या चाहत्यांना निराश होऊन घरी परतावे लागले. तथापि, ही समस्या तात्पुरती असून लवकरच स्क्रीनिंग पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन प्रदर्शकांनी दिले आहे.

नेमकी अडचण काय आली? 

'बॉर्डर 2' हा चित्रपट 192 मिनिटांचा (सुमारे 3 तास 12 मिनिटे) असून त्याचा फायनल कंटेंट गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तयार नव्हता. यूएफओ मूव्हीझ (UFO Movies) सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मने थिएटरना कळवले की, कंटेंट डाऊनलोडिंग प्रक्रिया शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता सुरू होणार होती. इतका मोठा चित्रपट डाऊनलोड होऊन प्रदर्शनासाठी तयार व्हायला किमान 3 ते 4 तास लागतात, त्यामुळे सकाळी 8 किंवा 9 चे शो पार पाडणे अशक्य झाले. कंटेंट वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेक थिएटर मालकांनी शो रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कधी पाहता येणार चित्रपट? 

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक अडथळे दूर करून सकाळी 10 वाजेपर्यंत देशभरात सर्वत्र शो सुरू होण्याची शक्यता आहे. दुपारी आणि संध्याकाळच्या शोवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. निर्मात्यांनी (टी-सीरीज) यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी, प्रदर्शकांनी परिस्थिती सामान्य होत असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या बिग बजेट चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने, हा तांत्रिक विलंब लवकरच भरून निघेल अशी आशा आहे.

हेही वाचा - Marathi OTT Platform NAFA Stream : मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना; 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री

'बॉर्डर 2' मध्ये काय आहे खास? 

दरम्यान, 1997 च्या ऐतिहासिक 'बॉर्डर' चित्रपटावर आधारित हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाची कथा एका नव्या दृष्टिकोनातून मांडतो. यात सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे अनुक्रमे वायूसेना, भूसेना आणि नौदलाच्या नायकांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे जुन्या 'बॉर्डर'मधील कलाकार जसे की सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना हे 'डिजिटली डीएज्ड' (Digitally De-aged) रूपात पाहायला मिळणार आहेत.

बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींच्या कमाईचा अंदाज 

तांत्रिक अडचणींनंतरही 'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिसवर मोठी सलामी देण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट 32 ते 35 कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सनी देओलच्या 'गदर 2' नंतरचा हा दुसरा मोठा ओपनिंग चित्रपट ठरू शकतो. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्ट्यांमुळे या चित्रपटाच्या कमाईत आणखी मोठी वाढ होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री