Sunday, March 08, 2026 01:35:12 PM

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत; गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

या प्रकरणात श्रेयस तळपदेवर असा आरोप आहे की, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी या कथित 'मुंबई बँके'च्या शाखेत गुंतवणूक करण्यासाठी गावकऱ्यांना प्रवृत्त केले होते.

shreyas talpade  अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप गुन्हा दाखल

FIR Against Shreyas Talpade : बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याच्यापुढे मोठे संकट आले आहे. श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी श्रेयसवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. अभिनेता राजपाल यादव सध्या तुरुंगात असतानाच, श्रेयस तळपदेवर झालेल्या या आरोपांमुळे मनोरंजन सृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगांव पोलीस ठाण्यात  श्रेयस तळपदेवर FIR दाखल करून घेण्यात आहे.

नेमकं प्रकरण काय?
भोगांव येथील मोहल्ला मिश्राणा येथील रहिवासी असलेल्या 14 पीडितांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या दाव्यानुसार, 'सागा ग्रुप' (Saga Group) आणि त्यांच्याशी संबंधित 'एलयूसीसी' (LUCC) बँकेच्या नावाखाली 2015 मध्ये एक शाखा उघडण्यात आली होती. या बँकेत शेकडो गावकऱ्यांनी आपली कष्टाची कमाई गुंतवली. मात्र, जेव्हा गुंतवणुकीचा कालावधी संपला आणि लोकांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा बँकेच्या संचालकांनी पैसे देण्यास नकार दिला. इतकेच नाही तर, 2024 मध्ये ही बँक अचानक बंद करण्यात आली, ज्यामुळे गावकऱ्यांचे लाखो रुपये अडकून पडले आहेत. याशिवाय, गावकऱ्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात श्रेयस तळपदेचे नाव कसे आले?
या प्रकरणात श्रेयस तळपदेवर असा आरोप आहे की, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी या कथित 'मुंबई बँके'च्या शाखेत गुंतवणूक करण्यासाठी गावकऱ्यांना प्रवृत्त केले होते. श्रेयस तळपदे या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करत होता आणि त्याच्या जाहिरातींमुळेच लोकांनी या योजनेवर विश्वास ठेवला, असे पीडितांचे म्हणणे आहे. या गुन्ह्यात समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आर.के. सेट्टी (फंड मॅनेजर), संजय मुदगिल, शबाब हुसेन आणि श्रेयस तळपदे यांच्यासह एकूण 12 लोकांची नावे FIR मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

हेही वाचा - Rahul Gandhi on Tariff: 'आपण तेल कुठून घ्यायचे हे आता अमेरिका ठरवणार का?'; लोकसभेत राहुल गांधींनी सरकारला घेरले

अनेक राज्यांमध्ये फसवणुकीचे जाळे
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या बँकेने केवळ मैनपुरीमध्येच नव्हे तर उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक गावांमध्ये लोकांची फसवणूक केली आहे. पीडितांकडे त्यांच्या ठेवींची सर्व कागदपत्रे उपलब्ध असून, त्यांनी पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, श्रेयस तळपदेने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अशा प्रकरणांमध्ये स्वतःचा कोणताही सक्रिय सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते. आपल्याला केवळ पाहुणे कलाकार म्हणून बोलावले गेले होते, असा दावा अभिनेत्याने केला आहे.

कायदेशीर प्रक्रियेला वेग
मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी 10 फेब्रुवारी 2026 रोजी हा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी बँकेचे व्यवहार, कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी सुरू केली आहे. श्रेयस तळपदेला सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून काही प्रकरणांमध्ये अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाले असले, तरी या नवीन गुन्ह्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा - Road Accident News: लग्नाचा आनंद ठरला शेवटचा; महामार्गावर भीषण अपघात; एकाच गावातील सहा तरुणांचा मृत्यू


सम्बन्धित सामग्री