Tuesday, March 17, 2026 02:45:55 PM

Mandana Karimi: इथे करिअर केलं, पैसा कमवला.. मात्र, आता भारतात आपला आवाज दाबला जात असल्याचा इराणी अभिनेत्रीचा सूर

या मुलाखतीत बोलताना इराणसोबत न उभे राहणे ही थेट भारताने आपली केलेली फसवणूक आहे, असे मंदानाने म्हटले आहे. तिच्या वक्तव्यांचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला आहे.

mandana karimi इथे करिअर केलं पैसा कमवला मात्र आता भारतात आपला आवाज दाबला जात असल्याचा इराणी अभिनेत्रीचा सूर

Mandana Karimi : इराणी वंशाची भारतीय अभिनेत्री आणि 'बिग बॉस 9' ची स्पर्धक मंदाना करीमी हिने भारत सोडण्याचा निर्णय घेतल्याने मनोरंजन विश्वात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने भारताला निरोप देत असल्याचे जाहीर केले. भारतात आपले विचार मांडताना "आपला आवाज दाबला जातोय" आणि आपल्या मतांना महत्त्व दिले जात नाही, असे विचार तिने व्यक्त केले आहेत.

मी भारताशी ब्रेक-अप करतेय 
मंदाना करीमी तरुण वयात मॉडेलिंग आणि अभिनयासाठी भारतात आली होती. 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, "भारताने मला करिअर, मैत्री आणि प्रेम सर्व काही दिले. मात्र, आता मला इथे खूप एकटेपणा जाणवत असून माझे कोणी ऐकणारे नाही असे वाटतेय. हे एखाद्या ब्रेकअपसारखे आहे." गेल्या 2 महिन्यांपासून इराणमधील राजकीय घडामोडींनंतर मंदाना अधिक व्यथित झाली असून, तिने बॅग भरून मायदेशी जाण्याची तयारी पूर्ण केली आहे, असे तिने म्हटले आहे.

इराणमधील शासन आणि राजकीय भूमिका
इराणमधील खामेनेई राजवटीविरोधात मंदाना नेहमीच बोलत राहिली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात ईराणी सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर तिने या दोन्ही देशांचे कौतुक केले होते. तिने इन्स्टाग्रामवर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो शेअर करत त्यांना 'सायरस द ग्रेट' असे संबोधले. मंदानाने इच्छा व्यक्त केली की, तिला असा इराण पाहायचा आहे जिथे महिलांना कपडे निवडण्याचे स्वातंत्र्य असेल आणि त्या भीतीविना जगू शकतील. "जशी ही राजवट संपेल, तशी मी इराणला निघून जाईन," असे तिने ठामपणे सांगितले.

हेही वाचा - Basmati Rice Export : इराण-इस्रायल युद्धामुळे बासमती तांदळाची निर्यात संकटात! 6 लाख टन माल समुद्रात अडकला

मुलाखतीनंतर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
या मुलाखतीत बोलताना इराणसोबत न उभे राहणे ही थेट भारताने आपली केलेली फसवणूक आहे, असेही तिने म्हटले आहे. तिच्या या वक्तव्यांचा भारतीय नेटिझन्सकडून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. तसेच, ती इथे बसून काहीही बोलली तरी तिचे डोके धडावेगळे केले जाणार नाही, तेव्हा तिने इथे आहे तोपर्यंत तिला हवे ते बोलून घ्यावे, असा टोमणाही काही जणांनी मारला आहे. तर, भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरही मंदानाने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता, याची आठवण काही लोकांनी करून दिली आहे. मंदानाच्या बेताल वक्तव्यांमुळे संतापलेल्या अनेकांनी तिला भारतातून ताबडतोब निघून जाण्याचा सल्लाही दिला आहे. तर, काही तिचे सर्वच बोलणे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

मंदानाचा बॉलिवूडमधील प्रवास आणि आता करिअरवर मोठा परिणाम झाल्याचे म्हणणे
मंदानाने 'भाग जॉनी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 'बिग बॉस 9' मध्ये ती दुसरी रनर-अप ठरली आणि घराघरात पोहोचली. अन्यायकारक गोष्टींविरुद्ध उघडपणे बोलणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. राजकीय आणि सामाजिक विषयांवर उघडपणे भाष्य केल्यामुळे मंदानाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिने आरोप केला की, इराणच्या मुद्द्यावर आवाज उठवल्यामुळे अनेक मित्रांनी तिच्यापासून दुरावा निर्माण केला आणि तिचे अनेक प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्ट्स रद्द करण्यात आले. यापूर्वी 'मीटू' मोहिमेदरम्यान साजिद खानवर आरोप केल्यानंतरही तिने बॉलिवूड सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र, तसे होताना दिसले नाही. मात्र, आता इराणमधील संकट आणि तिथल्या महिलांच्या अधिकारांसाठी लढण्याची इच्छा तिच्यामध्ये जागृत झाल्याचे तिचे म्हणणे आहे. आता तिचं जाणं चाहत्यांसाठी दुःखद असली, तरी तिचा निर्णय वैयक्तिक आहे आणि भारतासाठी भारताचं हित महत्त्वाचं आहे, असं लोकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा - Mamta Kulkarni: संन्यास की प्रसिद्धीचा खेळ? अभिनेत्री ममता कुलकर्णीचा 25 वर्षांनंतर अचानक कमबॅक; कलर्स हिंदीच्या 'या' प्रसिद्ध शोमध्ये करणार काम


सम्बन्धित सामग्री