Rishab Shetty On Dashavatar: कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी सध्या आपल्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा: चॅप्टर 1’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. भारतीय परंपरा, संस्कृती, श्रद्धा आणि जंगलाशी असलेली नाळ यांचे चित्रण करणारे सिनेमे बनवण्यात ऋषभ नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्याच्या कथांमध्ये मानवी जीवन आणि निसर्गातील नातं स्पष्टपणे दिसून येतं.
हेही वाचा - Baahubali 3 Rumors vs Reality : बाहुबली चित्रपटाचा सिक्वल येणार?; 'बाहुबली: दी एपिक'च्या अखेरीस होणार खुलासा, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
अलीकडेच ईटाईम्सला दिलेल्या खास मुलाखतीत ऋषभ शेट्टीने मराठी चित्रपटसृष्टीबद्दल, विशेषत: दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेतल्या ‘दशावतार’ या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘दशावतार’ चित्रपटाबद्दल विचारले असता ऋषभ म्हणाला, 'मी या चित्रपटाबद्दल खूप चांगले ऐकले आहे. सध्या आमच्या ‘कांतारा’च्या प्रमोशनमुळे मला तो पाहता आला नाही, पण लवकरच मी तो चित्रपट नक्की पाहणार आहे.
हेही वाचा - Richest Youtuber In India: भारतातील सर्वांत श्रीमंत यूट्यूबर्सच्या यादीत 'हा' ठरला नंबर वन
संस्कृती आणि मुळांवर आधारित कथांबद्दल बोलताना ऋषभने सांगितले, 'मुळं, संस्कृती आणि जंगलाच्या कथा कधीच जुन्या होत नाहीत. या विषयांवरील चित्रपट लोकांना विचार करायला लावतात आणि पुढच्या पिढ्यांसाठी मौल्यवान दस्तऐवज ठरतात.' सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ हा कोकणातील परंपरा आणि सामाजिक संघर्षावर आधारित नाट्य-थरारपट असून, त्याने आतापर्यंत 23.02 कोटी रुपये कमावले आहेत. तर ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ देशभरात तब्बल 256.50 कोटींची कमाई करत यशस्वी ठरला आहे. सध्या ‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ भारतीय संस्कृतीला समर्पित सिनेमांचे आदर्श उदाहरण म्हणून चर्चेत आले आहेत.