Wednesday, December 11, 2024 11:15:15 AM

Nagraj Manjule
नागराज मंजुळेंना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा 'महात्मा फुले समता पुरस्कार’ यंदाच्या वर्षी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना जाहीर झाला

नागराज मंजुळेंना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर

पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा 'महात्मा फुले समता पुरस्कार’ यंदाच्या वर्षी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी फुले वाडा येथील समता भूमी येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. नागराज मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रातील कार्यातून महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा सांगितला आहे. 

मंजुळे यांनी 'पिस्तुल्या' या लघुपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या लघुपटासाठी त्यांना नॉन-फीचर फिल्म श्रेणीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. मंजुळेंनी दिग्दर्शित केलेले 'फँड्री', 'सैराट', 'पावसाचा निबंध', 'झुंड' हे चित्रपट विशेष गाजले. यापैकी अनेक सिनेमांच्या निर्मिती आणि लेखनाचीही जबाबदारी मंजुळे यांनी हाताळली. 'नाळ', 'नाळ 2', 'तार', 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय कौशल्य सादर केले. नागराज मंजुळे यांना 'सैराट'साठी 2017 चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार त्यांना 2022 मध्ये प्रदान करण्यात आला. 

कोण आहेत नागराज मंजुळे ?
 
नागराज पोपटराव मंजुळे हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, आणि मराठी कवी आहेत. ते 'पिस्तुल्या' या लघुपटाचे आणि 'फॅंड्री', 'सैराट', 'झुंड' या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. नागराज मंजुळेंच्या 'पिस्तुल्या' या पहिल्या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा तसेच कुटुंबाच्या गरिबीमुळे तसेच त्याच्या जमातीसाठी ह्या समाजात खोलवर रुजलेले द्वेष आणि तिरस्कार या कारणांमुळे मुलांना औपचारिक शिक्षण मिळण्यासाठीची असमर्थता हा लघुपट दर्शवितो. प्रथम चित्रपट फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. फॅंड्री म्हणजे कैकाडी भाषेतील डुक्कर. नागराज मंजुळेंचा दुसरा चित्रपट 'सैराट' सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला. मंजुळेंचा 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा कवितासंग्रहही प्रकाशित झाला आहे. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण करणे तसेच कलाकृतीच्या माध्यमातून चतुराईने मनोरंजन करत सामाजिक संदेश देणे हे नागराज मंजुळे यांचे वैशिष्ट्य आहे.

नागराज मंजुळेंना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार

  1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - 2017
  2. नारायण सुर्वे काव्य प्रतिभा - 2014 
  3. दया पवार स्मृती - 2014
  4. 'उन्हाच्या कटाविरुद्ध' या कवितासंग्रहास भैरू रतन दमानी पुरस्कार - 2011

सम्बन्धित सामग्री


jaimaharashtranews-logo