Middle East War: मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विस्कळीत झाली असून, याचा फटका मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या कुटुंबाला बसला आहे. विशाखा यांचा मुलगा अभिनय सुभेदार गेल्या चार दिवसांपासून कुवैतमध्ये अडकला असून, तेथील वाढत्या तणावामुळे अभिनेत्रीने सोशल मीडियावर रडत मदतीची याचना केली आहे.
नेमकी अडचण काय?
अभिनय सुभेदार हा लंडनला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, प्रवासादरम्यान कुवैतमध्ये विमान थांबले असता, मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे एअर स्पेस (हवाई मार्ग) तातडीने बंद करण्यात आले. यामुळे त्याचे विमान पुढील प्रवासासाठी झेपावू शकले नाही आणि तो तिथेच अडकून पडला आहे.
विशाखा सुभेदार यांची सोशल मीडिया पोस्ट
सोशल मीडियावर एका भावूक व्हिडिओद्वारे विशाखा सुभेदार यांनी आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी सांगितले की, 'कुवैतमध्ये सध्या ड्रोन हल्ल्यांचे सत्र सुरू असून नागरिकांमध्ये कमालीची भीती आहे. गेल्या चार दिवसांपासून अभिनय कुवैतमध्ये अडकला असून सुरक्षेच्या कारणास्तव तिथे अनिश्चितता पसरली आहे. केवळ अभिनयच नाही, तर अनेक भारतीय नागरिक या युद्धामुळे आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत.'
हेही वाचा - Israel-Iran Conflict: खामेनीच्या हत्येचा निषेध नडला? 'या' मुस्लिम देशाचे सरकार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय ज्यू संघटना सक्रिय
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना साद
आपल्या मुलाच्या आणि इतर भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी विशाखा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मदतीचे हात पसरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.