कर्जत : प्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांचा कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतला आहे. स्टुडिओद्वारे शासन चित्रपट उद्योगाला चालना देणार असल्याचे वृत्त आहे.
नितीन देसाई यांनी व्यवसाय विस्तारासाठी एका खासगी वित्त पुरवठादार कंपनीकडून कर्ज उचलले होते. या कर्जाची परतफेड थकली होती. कर्जाची परतफेड करणे कठीण झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. नितीन देसाईंचे आर्थिक व्यवहार, पत्रव्यवहार तसेच त्यांनी आत्महत्येच्या आधीच्या काही दिवसांत कोणाकोणाशी संपर्क साधला याची माहिती घेण्यात आली. ही माहिती घेतल्यावर कर्जाचे प्रकरण लक्षात आले. ज्या कंपनीने कर्ज दिले होते त्यांनी वसुलीची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपवली होती. या कंपनीने कर्ज प्रकरणी त्यांची बाजू पोलिसांना सांगितली. कर्जाची वसुली अद्याप झालेली नाही हे पण जाहीर केले. यानंतर खासगी कंपनीने एन. डी. स्टुडिओचा लिलाव करुन कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेतला.
लिलावाची प्रक्रिया सुरू झाली. पण अपेक्षित रकमेची बोली आलीच नाही. अखेर लिलाव रद्द करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन स्टुडिओ ताब्यात घेण्याचा आणि कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला. ताब्यात घेतलेल्या स्टुडिओद्वारे महाराष्ट्र शासन राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देणार असल्याचे वृत्त आहे.