मुंबई : भारताच्या आय सी 814 या विमानाचे अपहरण करुन ते अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेण्यात आले होते. प्रवाशांच्या बदल्यात अपहरणकर्त्यांनी दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. या घटनेवर आधारित एक वेबसिरीज आली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटीवर आलेली ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अतिरेकी मुसलमान होते. पण वेबसिरीजमध्ये अतिरेक्यांना हिंदू नावं देण्यात आली आहे. या प्रकारावरुन नाराजी व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हाने हा प्रकार मुद्दाम केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने नेटफ्लिक्सकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
प्रत्यक्षात काय घडले होते ?
अतिरेकी मुसलमान होते. त्यांनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी विमानात टोपण नावाने एकमेकांना हाका मारल्या होत्या. ही टोपणनावं मुद्दाम हिंदू भासतील अशा स्वरुपाचीच वापरली होती. वेबसिरीजमध्ये अतिरेक्यांच्या खऱ्या नावांचा वापर करण्याऐवजी हिंदू नावांचाच वापर केला आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. डाव्या विचारधारेकडून ठरवून हिंदूंची बदनामी करण्यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. हा उद्योग दिग्दर्शक अनुभव सिन्हाने केला आहे, असाही आरोप होत आहे.
वाद काय आहे ?
- दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या नेटफ्लिक्सवरील आय सी 814 या वेबसिरीजमध्ये विमान अपहरणात शंकर आणि भोला असे दोन अतिरेकी सहभागी असल्याचे दाखवण्यात आले आहे.
- प्रत्यक्षात इंडियन एअरलाइन्सच्या १९९९ मध्ये अपहरण करण्यात आलेल्या विमानात एकही अतिरेकी हिंदू नव्हता.
- प्रत्यक्षात इब्राहिम अतहर, सैय्यद शाहिद अख्तर, सनी अहमद काझी जहुर मिस्त्री, शाकीर यांनी विमान अपहरण केलं.
- अनुभव सिन्हा याने खोडसाळपणा करत विमान अपहरणांमध्ये शंकर आणि भोला असे दोन हिंदू सहभागी असल्याचं वेबसिरीजमध्ये दाखवले आहे.
- एका बाजूला अतिरेक्यांची नावे हिंदू ठेवत असतानाच अनुभव सिन्हा याने सफाईदारपणे इतर मुसलमान अतिरेक्यांची नावे दडवली आहेत.
- इस्लामी अतिरेक्यांची टोपण नावे देताना अनुभव याने चतुराईने वेबसिरीजमध्ये चीफ, बर्गर आणि डॉक्टर असे शब्द वापरले आहेत.
- अनुभव सिन्हाच्या हिंदू बदनामीच्या प्रयत्नाविरोधात समाज माध्यमात प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे.
- हिंदूंच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेत केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे.