मुंबई: या शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध भाषांतील आणि वेगवेगळ्या प्रकारांतील चित्रपट व वेबमालिकांचा नवा संच प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे. मानसशास्त्रीय नाट्य, गुन्हेगारी थरारकथा, रहस्य, भयपट, प्रादेशिक आशयाचे चित्रपट तसेच आंतरराष्ट्रीय फॅंटसी मालिका अशा विविध रंगांचा समावेश या डिजिटल प्रदर्शितांमध्ये आहे. विकेंड खास बनवायचा असेल, तर या नव्या प्रदर्शितांकडे नक्कीच लक्ष द्यायला हवे.
अनुभूती कश्यप दिग्दर्शित ‘अक्यूज्ड’ हा मानसशास्त्रीय थरारपट 27 फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा याने एका नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका साकारली आहे. गंभीर लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमध्ये अडकलेल्या यशस्वी महिलेचे आयुष्य कसे ढवळून निघते, याची भावनिक आणि तणावपूर्ण मांडणी या कथेत पाहायला मिळते. प्रतिभा रांटा हिची भूमिका कथानकाला अधिक गती देते.
मल्याळम भाषेतील मानसशास्त्रीय रहस्य मालिका ‘सीक्रेट स्टोरीज: रोजलिन’ 27 फेब्रुवारीपासून जिओ हॉटस्टारवर प्रवाहित होत आहे. रोजलिन नावाच्या 17 वर्षांच्या मुलीला येणारी भयानक स्वप्ने आणि वास्तवात त्याच्यासारखी व्यक्ती घरात आल्यावर सुरू होणारा थरार, हा या मालिकेचा केंद्रबिंदू आहे. रहस्य, अनपेक्षित वळणे आणि भय यांचे प्रभावी मिश्रण या मालिकेत अनुभवता येते.
हेही वाचा: HSC Board Paper Leak: पोलिसांचा धाक संपुष्टात? गुन्हा दाखल होऊनही फुटला बारावीचा गणिताचा पेपर; 'कॉपी'बहाद्दरांचे धाडस आणि शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे
लोकप्रिय बंगाली गुन्हेगारी थरारकथा ‘अबार प्रोलॉय’चा दुसरा सिझन अधिक अॅक्शन आणि नाट्यमय घडामोडींनी परतला आहे. स्पेशल क्राइम ब्रांच अधिकारी अनिमेष दत्ता एका मोठ्या चोरीमागील धोकादायक टोळीचा शोध घेतात. ही मालिका झी5वर उपलब्ध आहे. त्याच प्लॅटफॉर्मवर तमिळ गुन्हेगारी थरारकथा ‘थडायम’ देखील प्रदर्शित झाली आहे. 1999 मध्ये तमिळनाडूतील सीमावर्ती गावात घडणाऱ्या खुनांच्या मालिकेमागील गूढ उलगडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा यात मांडली आहे. रहस्य, अॅक्शन आणि सस्पेन्स यांचा उत्तम संगम यात पाहायला मिळतो.
मराठी प्रेक्षकांसाठी ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा हृदयस्पर्शी चित्रपट 27 फेब्रुवारीपासून झी5वर उपलब्ध झाला आहे. दिग्दर्शक हेमंत धोमे यांच्या या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी मुख्याध्यापक दिनकर शिर्के यांची भूमिका साकारली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेला बंद होण्यापासून वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांसोबत पुन्हा एकत्र येणाऱ्या मुख्याध्यापकाची प्रेरणादायी कथा यात दाखवण्यात आली आहे. प्रादेशिक भाषेतील शिक्षण आणि वाढत्या इंग्रजी माध्यम शाळांमधील संघर्ष हा या कथानकाचा गाभा आहे.
आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये ‘मोनार्क: लिगसी ऑफ मॉन्स्टर्स’ या मालिकेचा दुसरा सिझनही प्रदर्शित झाला आहे. दहा भागांची ही मालिका स्कल आयलंडवरील रहस्यमय घटनांभोवती फिरते. कर्ट रसेल आणि वायट रसेल यांच्यासह इतर कलाकारांची प्रभावी कामगिरी यात पाहायला मिळते. ही मालिका ॲपल टीव्ही प्लसवर उपलब्ध आहे. एकूणच, या शुक्रवारी प्रत्येक प्रकारच्या प्रेक्षकांसाठी ओटीटीवर मनोरंजनाची रंगतदार मेजवानी सजली आहे.
हेही वाचा: Railway Pensioners Alert: रेल्वे पेन्शनधारकांनो सावधान! रेल्वे मंत्रालयाचा कडक इशारा; 'या' एका चुकीमुळे रिकामे होऊ शकते बँक खाते