Panvel-Karjat Railway: महामुंबईतील उपनगरी रेल्वे जाळ्यात लवकरच आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. पावसाळा संपल्यानंतर पनवेल ते कर्जत दरम्यानचा नवा उपनगरी रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या नव्या मार्गामुळे नवी मुंबई आणि रायगड परिसरातील नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पर्यायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून करजतला जाण्यासाठी मुख्यत्वे कल्याणमार्गे प्रवास करावा लागतो. मात्र, नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेलमार्गे करजतला जाण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे गर्दीचे विभाजन होऊन मध्य रेल्वेवरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा: Rohit Pawar : 'हा अहवाल किती गांभीर्याने बनवला...'; रोहित पवार यांची DGCA च्या अहवालावर पहिली प्रतिक्रिया
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (MRVC) या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे 30 किलोमीटर लांबीच्या या दुहेरी मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून उर्वरित तांत्रिक प्रक्रिया आणि अंतिम चाचण्या पूर्ण केल्यानंतर लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. सुरक्षा तपासण्या आणि रेल्वे सेफ्टी कमिशनरची मंजुरी मिळाल्यानंतरच प्रवासी वाहतूक सुरू होईल.
हा मार्ग मध्य रेल्वेसाठी पाचवा महत्त्वाचा कॉरिडॉर ठरणार आहे. सध्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि उरण (पोर्ट) मार्गांवर उपनगरी लोकल धावत आहेत. नव्या पनवेल-करजत मार्गामुळे उपनगरी रेल्वेचे एकूण जाळे 400 किलोमीटरपेक्षा अधिक विस्तारेल. भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हेही वाचा: Shirdi Saibaba Temple: साई दरबारातून महत्त्वाची अपडेट; 'या' दिवशी साईबाबांचे दर्शन घेता नाही येणार, 'हे' कारण आलं समोर
या नव्या मार्गावर एकूण पाच स्थानकांचा समावेश आहे. पनवेल, चिखले, पोयंजे (मोहापे), चौक आणि करजत. यामुळे नवी मुंबईतील वाढत्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तसेच करजत परिसरात स्थायिक होणाऱ्या कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रवास करता येणार असल्याने या भागातील विकासालाही गती मिळण्याची शक्यता आहे.
प्रकल्पातील काही कामे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. पनवेल आणि करजत स्थानकांवरील विद्यमान यार्डमध्ये बदल करताना नियमित रेल्वे वाहतूक अबाधित ठेवणे ही मोठी कसरत होती. तसेच या मार्गावर तीन बोगदे तयार करण्यात आले असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. काही ठिकाणी खडीमुक्त रुळांची बसवणूक करून अधिक सुरक्षित आणि कमी देखभालीची व्यवस्था करण्यात आली आहे.
नव्या मार्गामुळे मध्य रेल्वेवरील प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत होणारी प्रचंड गर्दी कमी करण्यास मदत होईल. भविष्यात या मार्गावरून थेट सीएसएमटी ते करजत लोकल धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.