मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात हलकल्लोळ उडवणारी एक घटना समोर आली आहे. झी मराठीवरील 'तू चालं पुढे' या मालिकेत 'तारा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची पिसाट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारणही तसेच आहे; प्राचीने थेट ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी तिला पाठवलेल्या कथित फ्लर्टिंग मेसेजचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राचीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुदेश म्हशीलकर यांचा फेसबुक मेसेज शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं 'तुझा नंबर पाठव ना… तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये… कसली गोड दिसतेस!' असा स्पष्ट आणि धक्कादायक मजकूर होता. या स्क्रीनशॉटवर प्रतिक्रिया देताना प्राचीने लिहिलं 'आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली...बायकोचा नंबर असलेच...ती ही गोड आहे...बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का...'
अर्थात, सोशल मीडियावर हा मुद्दा लगेच पेट घेतो. काहीजण प्राचीच्या बाजूने उभे राहतात, तर काहीजण सुदेश म्हशीलकर यांचं समर्थन करतात. अनेकांनी कमेंट्स करत सांगितलं की सुदेशसारखा माणूस असं काही करू शकत नाही. काहींनी त्यांच्या अकाउंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली आहे. खुद्द प्राचीने यावर उत्तर देताना म्हटलं की, 'मी कोणालाही त्रास द्यायचा हेतू ठेवलेला नाही. दोन वेळा इग्नोर केल्यानंतरही एखादा मॅच्युअर माणूस समजून घेऊ शकत नसेल, तर माझ्या मार्गानेच मेसेज थांबवावे लागतात.'
हेही वाचा: बापरे! शैम्पू, साबण, बॉडी लोशन वापरून होऊ शकतो कॅन्सर? वापरण्याआधी ही माहिती नक्की वाचा
या वादात आणखी वळण आलं जेव्हा प्राचीने सुदेश यांच्या आणखी एका मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यात लिहिलं होतं 'खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली... वाह.' या पोस्टने चर्चेला आणखी खतपाणी घातलं.
अभिनेते राजेश देशपांडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आणि सांगितलं की, 'हे सुदेशने केलेलं नाहीये. तो फेसबुकवर अनेक दिवस लॉगिन झालेला नाही. आणि तो असा माणूस नाही. काहीतरी गडबड आहे.'मात्र, प्राचीचा दावा वेगळा होता 'त्यानेच मेसेज केलाय असं त्यांनी अनेकांना सांगितलंय,' असं ती म्हणाली. तिने हॅकरबद्दलही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला 'बाय द वे, हॅकर मराठी होता... आणि हुशारही होता… मेसेज करताच लगेच मला अनफ्रेंड केलं'
सध्यातरी हे मेसेज प्रत्यक्षात सुदेश म्हशीलकर यांनीच पाठवलेत की त्यांचं अकाउंट खरोखर हॅक झालं आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. परंतु या घटनेने एक प्रश्न नक्कीच समोर आणलाय सोशल मीडियावरील अशा मेसेजेसला सामोरे जाताना सेलिब्रिटी महिलांनी कसं वागावं, आणि अशा प्रसंगांत काय कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत?
प्राचीने पोलिसांत तक्रार केली नसली तरी तिने सोशल मीडियावर आपल्या पद्धतीने आवाज उठवलाय आणि यामुळेच ही गोष्ट आता सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणं म्हणजे न्याय मिळवण्याचा एक वेगळा मार्ग ठरत चालला आहे, हे या प्रकरणावरून दिसतं.
हा प्रकार खरा आहे का फसवणूक हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट नक्की अभिनेत्री प्राची पिसाटच्या या धाडसाने एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. महिला कलाकारांनी अशा अनुभवांविषयी उघडपणे बोलणं ही काळाची गरज आहे.