सातारा: साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. अभिनेता रितेश देशमुख यांच्या 'राजा शिव छत्रपती' या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सध्या संगम माहुली परिसरात सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर, चित्रपटात काम करणारा एक कलाकार सौरभ शर्मा कृष्णा नदीत बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सौरभ शर्मा या तरुण कलाकाराची ओळख डान्सर म्हणून झाली असून, तो या चित्रपटाच्या काही नृत्य दृश्यांमध्ये सहभागी झाला होता. शूटिंग संपल्यानंतर काही कलाकार नदीकिनारी गेले असताना, सौरभ पाण्यात उतरला. मात्र त्याला नदीच्या पाण्याचा खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि नदीपात्रात बुडाला.
सहकाऱ्यांनी तातडीने आरडाओरड करून मदतीसाठी प्रयत्न केले, परंतु तोपर्यंत सौरभचा थांगपत्ता लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सातारा पोलिसांनी जलद गतीने शोधमोहीम सुरू केली होती. मात्र, अंधार पडल्यामुळे रात्री उशिरा शोध थांबविण्यात आला.
हेही वाचा : उन्हाच्या झळांपासून दिलासा: अमरावतीत दुपारच्या वेळचे ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय
आज सकाळपासून पुन्हा एकदा शोध कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक बचाव पथक यांनी मिळून कृष्णा नदीत बुडालेल्या सौरभचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत, मात्र प्रयत्न सुरूच आहेत.
सौरभ शर्मा हा मुंबई येथील रहिवासी असून 'राजा शिव छत्रपती' या चित्रपटात काम मिळाल्यामुळे तो खूप आनंदी होता, अशी माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली. ही घटना ऐकून संपूर्ण चित्रपट युनिट शोकाकुल झाले आहे. रितेश देशमुख यांनाही ही बातमी कळाल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
सध्या पोलीस अधिक तपास करत असून, या घटनेचा सविस्तर अहवाल तयार केला जात आहे. कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरील चित्रीकरणासाठी अधिक सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.