सातारा: छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने उभारलेले साताऱ्यातील शाहू कला मंदिर नाट्यगृह सध्या दुरवस्थेला सामोरे जात आहे. हे नाट्यगृह अनेक कलाकारांच्या आठवणींशी जोडलेलं असूनही, आज त्याकडे सातारा नगरपालिका आणि संबंधित प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. यामुळे केवळ नाट्यकलाकारच नव्हे, तर प्रेक्षक आणि नागरिकांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच या नाट्यगृहाची पाहणी केली असता त्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'या नाट्यगृहाचे एसी सतत बंद पडतात. मेकअप रूम आणि स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत खराब आहे. त्यातच अडगळीचे साहित्य उघड्यावर टाकले गेले आहे. ही परिस्थिती अतिशय लाजीरवाणी आहे.'
सयाजी शिंदे यांच्या मतानुसार, हे नाट्यगृह केवळ एक वास्तू नाही, तर ती कलावंतांची कर्मभूमी आहे. इथे अनेक प्रयोग झाले, अनेक कलाकार घडले. मात्र आज याच नाट्यगृहाकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. या स्थितीमुळे स्थानिक कलाकारांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.
स्थानिक नाट्यगृपांचे कार्यकर्ते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील या प्रकरणी सातारा महापालिकेवर नाराजी व्यक्त करत आहेत. 'छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असलेल्या संस्थेची अशी अवस्था होणे हे दुर्दैवी आहे,' असे मत अनेकांनी मांडले आहे.
हेही वाचा:सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण केरळमध्ये, पण ‘पूर्ण साक्षर’ किताब कुणाला? जाणून घ्या
साताऱ्यातील सांस्कृतिक जिवंतपणाचे प्रतीक असलेले हे नाट्यगृह जर वेळेवर डागडुजी न झाल्यास, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा हरवण्याची शक्यता आहे. कलाकारांची आणि नागरिकांची मागणी आहे की, या नाट्यगृहाची तात्काळ डागडुजी करून ते पूर्ववत करण्यासाठी महापालिकेने सक्रिय पावले उचलावीत.