मुंबई: भारतातील आघाडीचे पार्श्वगायक म्हणून ओळखले जाणारे सोनू निगम हे त्यांच्या सुरेल आवाजामुळे हिंदीसह अनेक भाषांमधील चित्रपटसृष्टीत लोकप्रिय आहेत. सध्या मात्र बेंगळुरूमधील कॉन्सर्टमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत सापडले असून, कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणावर गुरुवारी (15मे) सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. निगम यांनी आपल्याविरोधातील गुन्हेगारी कार्यवाही रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
वादाची सुरुवात कशी झाली?
25 एप्रिल रोजी बेंगळुरूतील ईस्ट पॉइंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काही प्रेक्षकांनी त्यांच्याकडे जोरदार आवाजात 'कन्नड गाणं गा' अशी मागणी केली. यावर प्रतिक्रिया देताना, सोनू निगम यांनी आपण कन्नड भाषेचा आदर करतो असं सांगितलं, मात्र त्यांनी यावेळी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला. कॉन्सर्टदरम्यान सोनू निगम म्हणाले, 'काही कारणासाठी पहलगाममध्ये जे झालं,… ते तुम्ही आत्ता केलं, हेच कारण आहे.' त्यांच्या या प्रतिक्रियेचा दहशतवादी हल्ल्याशी संदर्भ दिला गेल्यामुळे वाद पेटला.
हेही वाचा: चीनचा नवा कुरापतखोर डाव; अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याच्या प्रयत्नांना भारताचं सडेतोड प्रत्युत्तर
सोशल मीडियावरून टीका आणि गुन्हे दाखल
या विधानानंतर सोशल मीडियावर सोनू निगम यांच्यावर कन्नड भाषेचा आणि लोकांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. अनेकांनी हा प्रकार कन्नड प्रेक्षकांची बदनामी करणारा असल्याचं म्हटलं. या घटनेनंतर 2 मे रोजी बेंगळुरू ग्रामीण पोलीस ठाण्यात सोनू निगम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 351(2), 352(1), आणि 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
351(2) – गुन्हेगारी धमकी
352(1) – मुद्दाम अपमान करून शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न
353 – सार्वजनिक गैरसमज पसरवणे
या प्रकरणाच्या चौकशीसाठी बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सी. के. बाबा यांनी एका तपास अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
कर्नाटक फिल्म चेंबरचा निर्णय
सोनू निगम यांचं वक्तव्य प्रेक्षकांना खटकले आणि त्यानंतर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने गंभीर निर्णय घेत, 'जोपर्यंत सोनू निगम माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणत्याही कन्नड सिनेमात गाण्याची संधी दिली जाणार नाही,' असं जाहीर केलं.
सोनू निगम यांची बाजू
वाद वाढल्यानंतर सोनू निगम यांनी एक अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, 'माझं वक्तव्य संपूर्ण प्रेक्षकवर्गासाठी नव्हतं, ते फक्त एका व्यक्तीसाठी होतं. मी नंतर तब्बल एक तास कन्नड गाणी गायली आहेत. मी कन्नड भाषेचा अपमान केला नाही.' ते पुढे म्हणाले, 'मी आता 51 वर्षांचा आहे, माझ्या आयुष्याचा दुसरा टप्पा चालू आहे. कोणीतरी माझ्याच मुलाच्या वयाचा मुलगा मला हजारोंच्या गर्दीत धमकावत असेल, ते मी सहन करणार नाही. माझ्या कामामध्ये कन्नड ही माझी दुसरी भाषा आहे.'
13 मे रोजी सोनू निगम यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आपल्यावरील कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी या प्रकरणात तपास प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचीही विनंती केली आहे.न्यायमूर्ती शिवशंकर अमरानावर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका गुरुवारी सुनावणीसाठी येणार आहे.