मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत यशाचे नवे मापदंड निर्माण करणारा एक अभिनेता म्हणजे थालापती विजय. गेल्या दशकभरात एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या तामिळ सुपरस्टारने सलग 8 चित्रपट 200 कोटींच्या पार नेले आहेत. ही कामगिरी आजपर्यंत शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, प्रभास यांनाही जमलेली नाही. विजयने केवळ बॉक्स ऑफिसवरच वर्चस्व गाजवलं नाही, तर तो आता चित्रपटसृष्टीला अलविदा सांगून राजकारणातही पदार्पण करत आहे.
2017 मध्ये आलेल्या अॅटलीच्या मर्सल पासून विजयची ही यशस्वी मालिका सुरू झाली. त्यानंतर आलेले सरकार, बिगील, मास्टर, बीस्ट, वारिसु, लिओ आणि द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हे सर्व चित्रपट 200 कोटींच्या वर कमाई करून गेले. विशेष म्हणजे लिओ ने तर तब्बल ₹605 कोटींची कमाई करून रजनीकांतच्या जेलरलाही मागे टाकलं. विजयच्या 'GOAT' चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला, तरीही तो चित्रपट ₹400 कोटींच्या वर गेला.
हेही वाचा: 'जर बाबू भैय्या नसतील, तर श्यामचं काही अस्तित्व नाही' हेरा फेरी 3 मधून सुनील शेट्टीची एक्झिट?
या यशामुळे विजयने सलमान खान आणि अक्षय कुमारच्या 6 सलग 200 कोटींच्या रेकॉर्डलाही मागे टाकले आहे. शाहरुख खान सध्या 3 सलग 200 कोटींच्या चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे, पण विजयच्या आकड्यांपासून तो अजून खूप दूर आहे. इतर कोणताही भारतीय अभिनेता सलग 8 मोठ्या हिट्स देऊ शकलेला नाही.
विजय याने 2 फेब्रुवारी 2024 रोजी ‘तामिळगा वेत्त्री कळगम’ या नावाने स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना करत, राजकारणात उतरायची घोषणा केली. यासोबतच त्याने चित्रपट सृष्टीमधून निवृत्ती घेणार असल्याचंही जाहीर केलं. त्याचा शेवटचा चित्रपट जन नायकन 9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत.
51व्या वर्षी चित्रपटसृष्टीला अलविदा करत विजय आता लोकसेवेत स्वतःला झोकून देणार आहे. मनोरंजनाच्या दुनियेत आपली अमीट छाप सोडून, आता तो जनतेच्या मनात स्थान निर्माण करणार आहे.