Singer Passes Away : रॉक संगीताच्या विश्वात आपल्या जादुई आवाजाने करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमेरिकन गायक ब्रॅड अर्नोल्ड यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते चौथ्या टप्प्यातील (Stage 4) किडनी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याने संगीत क्षेत्रावर दुःखाची लाट पसरली आहे. त्यांच्या जाण्याने रॉक म्युझिकमधील एक सुवर्णकाळ संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
झोपेतच घेतला अखेरचा श्वास
'3 Doors Down' या जगप्रसिद्ध रॉक बँडने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. बँडने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी अत्यंत धैर्याने लढा दिल्यानंतर, ब्रॅड यांनी शनिवारी रात्री शांतपणे झोपेतच जगाचा निरोप घेतला." आजाराशी झुंजत असतानाही त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन अनेक चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरला होता.
हेही वाचा - RSS Centenary Year: संघाच्या व्यासपीठावर 'भाईजान'ची एन्ट्री! सलमान खानला पाहताच प्रसाद ओक झाला 'शॉक'; म्हणाला, "त्याने येणं म्हणजे.."
गणिताच्या तासापासून ग्रॅमी नामांकनापर्यंतचा प्रवास
ब्रॅड अर्नोल्ड यांचा सांगीतिक प्रवास एखाद्या चित्रपटासारखा रोमांचक होता. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शाळेत गणिताचा तास सुरू असताना त्यांनी एका कागदाच्या तुकड्यावर 'Kryptonite' हे गाणे लिहिले होते. पुढे हेच गाणे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे 'हिट' ठरले आणि त्यांना 'ग्रॅमी' नामांकन मिळवून दिले. 1995 मध्ये मिसिसिपीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास 1999 मध्ये जागतिक स्तरावर पोहोचला. त्यांच्या 'द बेटर लाईफ' या पहिल्या अल्बमच्या 60 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या, जो एक मोठा विक्रम मानला जातो.
रॉक संगीतातील तारा
दरम्यान, ब्रॅड यांनी आपल्या कारकिर्दीत 6 स्टुडिओ अल्बम रिलीज केले आणि पोस्ट-ग्रंज म्युझिकला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. 2003 मध्ये 'When I'm Gone' या गाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांदा ग्रॅमी नामांकन मिळाले होते. सर्वसामान्यांच्या भावनांना स्पर्श करणारे शब्द आणि दमदार आवाज ही त्यांची खासियत होती. त्यांच्या निधनामुळे जागतिक संगीत क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, जगभरातील संगीतकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.