Career Struggle : यशाच्या शिखरावर असलेल्या आणि ग्लॅमरस विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री मृणाल ठाकूरने अलीकडेच तिच्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण आणि काळ्या दिवसांचा खुलासा केला आहे. आज कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मृणालने सांगितले की, संघर्षाच्या काळात तिला जीवन संपवण्याचे विचार येत होते. इतकेच नव्हे, तर नैराश्याच्या भरात एकदा तिने चालत्या लोकल ट्रेनमधून उडी मारून जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णयही घेतला होता.
वाराणसीच्या मंदिरात झाला भूतकाळाचा 'फ्लॅशबॅक'
मृणालने एका मुलाखतीत वाराणसी (बनारस) येथील तिच्या एका भावनिक अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली, "मंदिरात डोळे मिटून बसलेले असताना अवघ्या 30-40 सेकंदात माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोरून गेला. वडिलांचा चेहरा आणि मी लोकलच्या दारावर उभी राहून उडी मारण्याचा विचार करत असलेला तो भयानक क्षण... सगळं काही एखाद्या चित्रपटासारखं समोर आलं. पण त्या क्षणी मला जाणीव झाली की, मी त्या सर्व संकटांतून सुखरूप बाहेर पडले आहे आणि आज एका चांगल्या स्थानी आहे."
नकार आणि लग्नाची भीती; मानसिक संघर्षाची कहाणी
मृणालने तिच्या सुरुवातीच्या दिवसांतील मानसिक स्थितीवर भाष्य करताना सांगितले की, ऑडिशन्समध्ये सतत मिळणाऱ्या नकारांमुळे तिच्या मनात न्यूनगंड तयार झाला होता. तिला वाटायचे की आपल्यात काहीच विशेष नाही. वयाच्या 23-24 व्या वर्षी करिअरमध्ये यश न मिळाल्यास घरचे लग्न लावून देतील आणि आपण संसारात अडकून पडू, या भीतीने तिला ग्रासले होते. याच मानसिक दबावाखाली रेल्वेने प्रवास करताना अनेकदा तिच्या मनात जीवन संपवण्याचे विचार यायचे.
हेही वाचा - Devkhel Marathi Web Series Controversy : 'जनमानसात असंतोष, आपण लक्ष द्यावे'; 'देवखेळ'साठी आशिष शेलार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पत्रकारितेपासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
मृणालने आपल्या करिअरची सुरुवात पत्रकारितेच्या शिक्षणापासून केली होती. त्यानंतर तिने टेलिव्हिजन मालिकांच्या माध्यमातून घराघरात प्रवेश केला. मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही स्वतःचे स्थान पक्के केले आहे. 'सीता रामम' सारख्या चित्रपटांमधून जगभर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मृणालचा हा प्रवास, संकटांशी लढणाऱ्या अनेक नव्या कलाकारांसाठी आणि तरुणांसाठी आज मोठी प्रेरणा ठरत आहे.