मुंबई: जगभरात, जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आंतरराष्ट्रीय वडील दिन साजरा केला जातो. या दिवशी, अनेक युवापिढी आपल्या वडिलांना आंतरराष्ट्रीय वडील दिनाच्या शुभेच्छा देतात, तर या दिवशी अनेकजण आपल्या वडिलांसोबत हा दिवस विविध पद्धतीने साजरा करतात. अशातच, काही युवापिढी आपल्या वडिलांना घेऊन चित्रपट पाहायला जातात, किंवा घरबसल्या चित्रपट पाहतात. मात्र, या चित्रपटातील काही वडील असे आहेत, जे खऱ्या आयुष्यात अनेकांसाठी आदर्श ठरले आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
1 - 'गुंजन सक्सेना'चे वडील अनुप सक्सेना:
'विमान एखाद्या मुलाने उडवले किंवा मुलीने, ओळख तर पायलट म्हणूनच बनेल ना?', असं म्हणून अनुप सक्सेना म्हणजेच अभिनेता पंकज त्रिपाठीने साकारलेल्या या पात्राने अनेक मुलींना उंच आकाशात भरारी घेण्यासाठी एक नवी दिशा दिली.
2 - 'छिछोरे' चित्रपटातील अनिरुद्ध पाठक:
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने साकारलेल्या 'छिछोरे' चित्रपटातील अनिरुद्ध पाठक ही व्यक्तीरेखा आपल्या मुलाला शिकवते की जीवन हे अनमोल आहे, जेव्हा त्याचा मुलगा जीवन मृत्यूशी झुंज देत असतो.
3 - 'अंग्रेजी मिडीयम'चे चंपक बन्सल:
या चित्रपटात दिवंगत अभिनेता इरफान खानने एका मध्यमवर्गीय वडिलांची भूमिका साकारली आहे, जो आपल्या मुलीच्या सुखासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी काहीही करण्यास तयार असतो.
4 - 'पिकू' चित्रपटातील भास्कर बॅनर्जी:
जेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी साकारलेली 'पिकू' चित्रपटातील ही व्यक्तिरेखा त्यांच्या मुलीला लग्न करून सेटल होण्याऐवजी स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याचा सल्ला देते.
5 - 'दंगल'चे महावीर फोगट:
'रील' आणि 'रिअल' जीवनात, दोन्हीमध्ये महावीर फोगट यांच्या रूपात वडील म्हणून असलेले पात्र आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे, ज्यांच्यासाठी त्यांच्या मुली त्यांच्या मुलांपेक्षा कमी नाहीत.