मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कलाविश्वात शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या भूमिकांनी मराठी सिनेमात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 1940 साली पुण्यात जन्मलेल्या दया डोंगरे यांना कलेचा वारसा पिढ्यान्पिढ्या चालत आला होता. त्यांच्या आई यमुनाबाई मोडक या प्रसिद्ध नाट्यअभिनेत्री होत्या, तर आत्या शांताबाई मोडक गायिका होत्या. तसेच त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते. शालेय काळापासूनच अभिनयाची आवड असलेल्या दया फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत असत. नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) नाट्यशिक्षण घेतले, जिथे त्यांना गायन आणि अभिनयासाठी शिष्यवृत्ती मिळाली.
हेही वाचा : Paresh Rawal: “पुरस्कार हे फक्त प्रतिभेवर नाही, तर लॉबिंगवरही असतात अवलंबून”; अभिनेते परेश रावल यांचा धक्कादायक खुलासा
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांनी 1964 पासून दिल्ली दूरदर्शनवर काम करत 1972 मध्ये मुंबई दूरदर्शनमध्ये ‘गजरा’, ‘बंदिनी’ आणि ‘आव्हान’ यांसारख्या कार्यक्रमांसाठी काम केले. ‘स्वामी’ या लोकप्रिय मालिकेत गोपिकाबाईची भूमिका साकारून त्यांनी छोट्या पडद्यावर यश मिळवले. नाटकांमध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. मराठी चित्रपटसृष्टीत ‘उंबरठा’ (1982) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून दया यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. यानंतर ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नकाब’, ‘लालची रुक्ष माती’, ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘कुलदीपक’ यांसारख्या मराठी-हिंदी चित्रपटांत त्यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या.
आशिष शेलार यांनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...
भावपूर्ण श्रद्धांजली! कसदार अभिनयाची देणगी लाभलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री दया डोंगरे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू आणि करारी स्त्रीच्या भूमिका त्यांच्या नावाशिवाय अपूर्णच वाटतात. नाटक, चित्रपट आणि मालिका या सर्व माध्यमांतून त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयाची छाप रसिकांच्या मनावर उमटवली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि डोंगरे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती.