Tue. Aug 9th, 2022

आरे वाचावा मोहीम पुन्हा आक्रमक

Mrunali Chavan 

बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कट्टर शिवसैनिक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारला. त्यानंतर भाजप-शिवसेनेच्या युतीचे नवे सरकार महाराष्ट्रात स्थापित झाले असून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनेक मोठे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई मेट्रो कारशेडवर असलेली स्थगिती उठवली आहे. तसेच मेट्रोचे कारशेड आरेतच होणार असल्याचे जाहीर  केले आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला असला तरी पर्यावरण प्रेमींकडून आरेतील कारशेडला विरोध दर्शवण्यात येत आहे.

आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारण्यास शिंदे-फडणवीस सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. मात्र, या कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. पर्यावरणप्रेमी आरे कारशेडला मोठा विरोध दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आरे परिसरात पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आले. तसेच नागपूर, वाराणसी आणि  हैदराबाद या शहरांमध्ये आंदोलन केले जाणार आहे.

आरेचा नेमका वाद काय आहे?

मेट्रो कारशेडचा हा वाद बऱ्याच काळापासून सुरु आहे. हा वाद न्यायालयात सुद्धा पोहचला होता. २०१९मध्ये महाविकासआघाडी सरकारने राज्याची सुत्रे हाती घेताच दुसऱ्याच दिवशी नोव्हेंबर २०१९मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथे कारशेड बांधण्याचा फडणवीसांचा निर्णय रद्द केला. मविआ सरकारने आरे येथे सुरू असलेला प्रकल्प रद्द करत कांजूरमार्ग येथील मिठाच्या जमिनीवर कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला. तसेच आरेमधील सुमारे ८०० एकर जमीन राखीव जंगल म्हणून घोषित केली. दरम्यान, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-३ कारशेडच्या मुद्द्यांवर चर्चा केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात मेट्रो-३ कारशेड आरे येथून कांजुरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय मागे घेतला असून मेट्रोचे कारशेड आरेमध्येच होण्याचे निर्देश शिंदे सरकारने दिले आहेत. त्यामुळे आरेमध्ये कारशेडचे बांधकाम पुन्हा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.