मुलीच्या खून प्रकरणी कुटुंबीयांची गृहमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी

पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीत शिकणाऱ्या कबड्डी खेळाडू क्षितिजा अनंत व्यवहारे या मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी क्षितिजाच्या कुटुंबियांनी संरक्षणासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे.
‘सदरच्या खुनाचा खटला हा फास्टट्रॅक न्यायालयांमध्ये चालवण्यात यावा व विशेष सरकारी वकील म्हणून कुटुंबियांच्यावतीने हेमंत देवराम झंचाचड यांची महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्त करावी. तसेच मुलीच्या कुटुंबियांना आरोपीपासून जीविताला धोका आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.’ अशी मागणी क्षितिजाच्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुण्यातील कबड्डी खेळाडू क्षितिजा अनंत व्यवहारे या मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे पुणेकर हादरून गेले होते. या प्रकरणी आरोपींचा शोध घेऊन तीन अल्पवयीन मुलांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.