Tue. Jun 28th, 2022

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण

  एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. एसटी कर्माचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण केले आहे. नाशिकमधील एनडीपटेल रोडवरील एसटी डेपोमध्ये या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन उपोषण केले. कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा तसेच वार्षिक वेतनावढ ३ टक्के करण्यात यावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे.

  येत्या दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी उपोषण पुकारले आहे. या उपोषणाला राज्यातील २१ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. तसेच राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संप करण्याचा इशारा नाशिकमधील इंटकचे नेते जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे.

  मनमाड आगारातील एसटीप्रवास बंद करत मानमाडमील एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. वार्षिक वेतनवाढ दर ३ टक्के असावा तर राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता लागू करावा, तसेच दिवाळीपूर्वी १५ हजार रुपये बोनस द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी मनमाड राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले.

 धुळ्यातही वेतनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बससेवा बंद करत उपोषण सुरू केले आहे. कर्मचारी संघटना पगारवाढीवर ठाम आहेत. राज्य सरकार तुटपुंजी मदत करून एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत असल्याचा आरोपही कर्मचारी संघटनांकडून करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बससेवा बंद केल्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.