Thu. Apr 22nd, 2021

लठ्ठ व्यक्तींनी संसर्गजन्य आजारांपासून सावध असणं का गरजेचं आहे….

बॉडी माय इंडेक्स (बीएमआय) कसे तपासले पाहिजे…

डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांच्यानुसार शारीरिक स्थूलता किंवा वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्यास विविध जीवनशैलीशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध झालेले आहे. पण आता लठ्ठपणामुळे कोरोनाचा धोकाही वाढतोय. लठ्ठ व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यांना सहजासहजी त्या विषाणूला परतवून लावता येत नाही. अतिलठ्ठ व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्यास गुंतांगुत अधिकच वाढू शकते. त्यामुळे कुठल्याही व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आपले वजन कमी करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करता येईल. २०२० या वर्षात कोविड-१९ या व्हायरसचा सर्वांधिक धोका हा लठ्ठ व्यक्तींना जास्त असल्याचे विविध अहवालावरून समोर आले आहे. आतापर्य़ंत जेवढे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत त्यातील अधिकतर रूग्ण हे लठ्ठ होते. पण वेळीच आजाराचे योग्य निदान व उपचार न झाल्यास लठ्ठपणामुळे जोखीम वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी लठ्ठ व्यक्तींनी जास्त सावध असणे आवश्यक आहे. स्थूलतेमुळे टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचा रोग, आणि रक्त गोठणे यांसारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय फुफ्फुसावरही लठ्ठपणामुळे परिणाम होतो. तसेच लठ्ठ व्यक्तीच्या शरीरात या विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी शक्ती नसल्याने आजार वाढू शकतो. अशा स्थितीत बऱ्याच रूग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार द्यावे लागतात. कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधितांचा आकडाही वाढतोय. त्यामुळे कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी वाढत्या वजनावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बॉडी माय इंडेक्स (बीएमआय) तपासून घेणं गरजेचं आहे.

बॉडी माय इंडेक्स (बीएमआय) कसे तपासले पाहिजे… प्रत्येक व्यक्तीची उंची आणि वजन यामुळे बॉडी माय इंडेक्स (बीएमआय) ठरवला जातो. यात बीएमआयनुसार १८.५ आणि २३.५ च्या दरम्यान असलेल्या व्यक्तीचे वजन सामान्य असते.

* १८.५ पेक्षा कमी BMI = कमी वजनाचे

* बीएमआय १८.५ – २३.५ = सामान्य वजन

* बीएमआय २३.५ – २७.५ = जास्त वजन

* बीएमआय २७.५ – ३२.५ = लठ्ठपणाच्या खाली

* बीएमआय ३२.५ -३७.५ = लठ्ठपणा

* बीएमआय ३७.५ पेक्षा जास्त = अतिलठ्ठ

लॉकडाऊनमध्ये वाढले वजन अचानक लॉकडाऊन झाल्याने अनेकांना घर बसल्याशिवाय पर्याय नसतो. कोरोनाच्या भितीमुळे व्यायामशाळा, उदयाने, योग केंद्रे आणि मैदाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे शारीरिक हालचाल मंदावली होती. म्हणून अनेकांचे वजन या काळावधीत वाढल्याचे दिसून आले आहे. याशिवाय लॉकडाऊनमुळे आर्थिक अस्थिरता, नोकरी जाण्याची भिती, कौटुंबिक समस्या आणि मानसिक तणाव वाढला होता. तसेच घरी वेळ जावा यासाठी अनेक जण मसालेदार व तेलकट पदार्थ बनवून खात होते, हे सुद्धा वजन वाढीला कारणीभूत ठरले आहे. मुळात, लठ्ठपणाने त्रस्त असणाऱ्यांच्या वजनात घरी राहिल्याने अधिकच वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

लठ्ठ व्यक्तींनी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

• शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करणे ही काळजी गरजेचं आहे. तसेच दररोज संतुलित आहार घ्यावा.

• तणाव कमी व्हावा, यासाठी दररोज सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

• पौष्टिक आहार न घेणं, अपुरी झोप, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव ही लठ्ठपणा वाढीस लावणारी चार प्रमुख कारण आहेत. परंतु, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाद्वारे लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो.

• लठ्ठपणा हा एक आजार असून तो अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी बँरिअट्रिक सर्जनचा सल्ला घेतला पाहिजे.

टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग आणि पीसीओएस, फुफ्फुसाशी संबंधित आजार आणि यकृत रोग यांसारख्या अनेक संबंधित आजारांचे मूळ कारण लठ्ठपणा आहे. मुळात, लठ्ठपणा कमी करून घेण्यासाठी बँरिअट्रिक शस्त्रक्रिया हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. लठ्ठपणा ही अशी अवस्था आहे ज्यात शरीरातील अन्य अवयवांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याशिवाय लठ्ठ व्यक्तींनी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी हातपाय धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर या नियमावलीचे पालन करणे गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *