Fri. Oct 7th, 2022

प्रभादेवीत बेस्ट सब स्टेशनला भीषण आग

मुंबईमधील प्रभादेवी येथील दैनिक सामनाच्या कार्यालयाजवळ असणाऱ्या बेस्टच्या वीज सबस्टेशन केबिनला भीषण आग लागली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. या घटनेमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

दुपारी अचानकपणे सबस्टेशनला आग लागल्याने खळबळ उडाली. या आगीत दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आणि तीन मोठे स्विच जळून खाक झाले आहेत. तर, या केबिनजवळ असलेल्या ५ दुचाकींना आगीची झळ बसल्याने नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याची चौकशी करण्यात येत आहे. सब-स्टेशनच्या माध्यमातून परिसरातील वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे सब-स्टेशन अतिशय महत्त्वाचे आहे. प्रभादेवीतील सब-स्टेशनमध्ये भीषण आग लागल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. परिसरातील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे मोठं आव्हान असणार आहे.

प्रभादेवीत हा भाग मोठ्या प्रमाणावर निवासी भाग आहे. सब स्टेशनला लागलेल्या आगीमुळे धुराचे लोळ उठले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सब-स्टेशनचे किती नुकसान झाले आहे, हे स्पष्ट होणार आहे. परिसरातील वीज पुरवठा पुन्हा तातडीने सुरळीत करण्याचे आव्हान बेस्ट प्रशासनासमोर असणार आहे. मुंबई शहर भागात बेस्टकडून वीज पुरवठा केला जातो. तर, काही ठिकाणी टाटा पॉवरकडून वीज पुरवठा होतो. मुंबई उपनगरात अदानी पॉवर आणि टाटा पॉवरकडून वीज पुरवठा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.