Mon. Aug 8th, 2022

जीईआरडी आणि हायट्स हर्निया म्हणजे काय? जाणून घ्या

कोरोनामुळे नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आल्याने या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना छातीत जळजळ, असिडीटी, अन्न गिळताना अडचण येणं आणि गॅस्ट्रोएफँगेअल (जीईआरडी) अशा प्रकारच्या पचनासंबंधी समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे जीईआरडी आणि हायट्स हर्निया म्हणजे नेमंक काय? या आजाराला कसा प्रतिबंध घालता येऊ शकेल याबाबत सविस्तर जाणून घेणं गरजेच आहे.

जीईआरडी यालाच गर्ड म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे, ज्यात आपण खाल्लेल अन्न तोंडातून अन्ननलिकेद्वारे जठरामध्ये जाते. अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी एक झडप असते. ही झडप उघडली की अन्न जठरामध्ये जाते. आणि झडप पूर्ण बंद होते. ही झडप बंद झाल्यामुळे अन्न आणि जठरातील आम्ल पुन्हा उलट मार्गाने अन्ननलिकेत प्रवेश करू शकत नाही. अशारितीने एकेरी वाहतूक सुरळीत सुरू असते. यामुळे पोटातील घटक पुन्हा अन्ननलिकेत वर जातात. यामुळे अस्वस्थ वाटू लागतं. हृदयात जळजळ होऊ लागते. मुख्यतः गर्भवती महिलांसह बर्‍याच लोकांमध्ये जीईआरडीमुळे छातीत जळजळ किंवा अपचनाची समस्या उद्भवू शकते.

हायट्स हर्नियाबद्दल जाणून घ्या…

हायट्स हर्निया हा हर्नियाचा एक प्रकार आहे. यात उदराचा काही भाग छिद्रपटलातून छातीमध्ये शिरतो. या छिद्रपटलाने उदर आणि छातीतील अवयव वेगले झालेले असतात. हायटस हर्निया छिद्रपटलाला चीर पाडतो. हायट्स हर्निया हा अनुवांशिक आजार असून जन्मतः असू शकतो. वयोवृद्ध आणि स्थूलपणा हे सुद्धा हर्निया होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. जांघेत किंवा नाभीच्या ठिकाणी गाठ येणं, उदराच्या खालील भागात दुखणं, वजन उचलताना किंवा खोकताना वेदना होणं किंवा अस्वस्थ वाटणं ही हर्नियाची लक्षणे आहेत. ज्यांना हायट्स हर्नियाचा त्रास होतो अशा व्यक्तींमध्ये वारंवार उलट्या होणं, छातीत जळजळ, दम लागणं अशी लक्षणं दिसून येतात.

पचनासंबंधी समस्या टाळण्यासाठी या उपाययोजना करा….

जीईआरडी किंवा हायट्स हर्निया हे पचनासंबंधी विकार होऊ नयेत, यासाठी जीवनशैलीत चांगला बदल करणं आवश्यक आहे.
समतोल आहाराचे सेवन करा, मेदयुक्त पदार्थ, तेलकट, खारट, जंकफूडचे सेवन करणे टाळावेत.
झोपताना डोक्याखाली दोन उशा घेऊन झोपावेत.
गरजेपेक्षा जास्त आहाराचे सेवन करणे टाळा.
एकाच वेळी भरपेट न जेवता, ठराविक अंतराने थोडे-थोडे खाण्याची सवय लावून घ्या.
औषधोपचार घेऊनही रूग्णाला बरं वाटत नसल्यास डॉक्टर रूग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देतात.

डॉ. अपर्णा गोविल भास्कर, यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायट्स हर्नियावर शस्त्रक्रिया ही लेप्रोस्कोपिकद्वारे केली जाते. ओटीपोटीत ०.५ ते १ सेंटीमीटर इतके ४ ते ५ छेद करून ही शस्त्रक्रिया करण्यात येते. या शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला वेदनाही कमी होते आणि प्रकृती पटकन सुधारते. बऱ्याच रूग्णांना शस्त्रक्रियेनंतर सहा तासांनी खायची परवानगी दिली जाते. रूग्णाची प्रकृती उत्तम असल्यास दुसऱ्या दिवशी त्याला घरी सोडले जाते. लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे आठवड्याभरात रूग्ण पुन्हा नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगू शकतो.

अनेकदा हर्नियाचा त्रास असणारे लोक शस्त्रक्रियेच्या भीतीपायी डॉक्टरांकडे येणं टाळतात. अशावेळी त्रास अधिक वाढल्यावर रूग्ण डॉक्टराकडे येतो. आजारातील गुंतांगुत अधिकच वाढल्याने शस्त्रक्रिया करून अवघड होते. अशा रूग्णांसाठी हायटस हर्निया शस्त्रक्रिया किंवा लेप्रोस्कोपिक निस्सेनच्या फंडोप्लीकेसन ही एक शस्त्रक्रिया आहे जी हायट्स आणि जीईआरडीच्या उपचारात केली जाते. ही शस्त्रक्रिया अतिशय सुरक्षित आहे. परंतु, कोणालाही हायट्स हर्नियाशी संबंधित लक्षणं आढळून आल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरून वेळीच उपचार झाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.