Thu. May 19th, 2022

महापौरांच्या फिर्यादीनंतर आशिष शेलारांवर गुन्हा दाखल

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते ऍड. आशिष शेलार अडचणीत सापडले आहेत. आशिष शेलारांनी केलेल्या विधानामुळे महपौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यामुळे महापौरांच्या फिर्यादीनंतर ऍड. आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आज पोलीस आशिष शेलारांचा जबाब नोंदविणार आहेत. ऍड. आशिष शेलार आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले असून भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अतुल भातखळकरदेखील तेथे उपस्थित होते.

ऍड. आशिष शेलार यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याबाहेर भाजपने शक्तिप्रदर्शन केले. तसेच ‘मी कुठलाही गुन्हा केलेला नाही’, असा जबाब आशिष शेलारांनी नोंदविला आहे. माझा संघर्ष सुरूच राहणार असून सत्तेचा दुरुपयोग करून मुंबई महापौरांनी खोटी तक्रार केली असल्याचे, ऍड. आशिष शेलार यांनी सांगितले.

आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शेलारांच्या घराबाहेर शेलारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘भाजप कधी चुकला नाही, नरमला नाही, दबलाही नाही’ अशा शब्दांत शेलारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.

काय आहे प्रकरण?

३० नोव्हेंबर रोजी वरळीमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोट झालेल्या घटनेत ४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला असून त्याच्या आई-वडिलांचाही या दुर्घेटनेत निधन झाले. त्यामुळे याप्रकरणी ४ डिसेंबर रोजी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापौरांवर टीका केली. सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात, अशी टीका शेलारांनी केली. यावर महापौरांनी आक्षेप घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहित तक्रार केली. त्यामुळे महापौरांच्या फिर्यादीनंतर ऍड. आशिष शेलार यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.