Tue. Dec 7th, 2021

स्वप्निल जोशीचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विशेष सत्कार

मुंबई : प्रख्यात सिनेअभिनेता स्वप्निल जोशी यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी ६ जानेवारी २०२१ रोजी उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष सत्कार करण्यात आला. सरत्या वर्षात म्हणजे २०२० मध्ये ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा मान्यवरांचा सत्कार यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला. राज भवन येथे पार पडलेल्या या देखण्या अशा समारंभात स्वप्निल जोशी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्याबरोबरच पोलीस कर्मचारी-अधिकारी, पत्रकार, डॉक्टर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक श्री संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरण जोशी तसेच दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक श्री योगेश जाधव, दैनिक लोकमतचे समूह संपादक श्री विजय बाविस्कर हे मान्यवरसुद्धा यावेळी उपस्थित होते. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वप्निल जोशीहे आज मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक आघाडीचे नाव आहे. वयाच्या नवव्या वर्षी ‘उत्तर रामायण’ या हिंदी मालिकेत कुशची भूमिका सकारात त्यांना रुपेरी दुनियेत प्रवेश केला आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे गाजलेले चित्रपट केले आहेत. हद कर दी, दिल विल प्यार व्यार, अमानत, कहता है दिल, भाभी, तुतुमैंमैं, कॉमेडी सर्कस, पापड पोल यांसारख्या हिंदी मालिकाही त्यांनी केल्या आहेत.

‘गुलाम-ए-मुस्तफा’ या हिंदी चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.स्वप्निल जोशी हे नाव आज घराघरात लोकप्रिय आहे. “माझ्या मनोरंजन क्षेत्रातील कामाची नोंद घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जो गौरव करण्यात आला, त्याबद्दल मी पत्रकार संघाचे आभार मानतो. हा सत्कार माननीय राज्यपालांच्या हस्ते झाल्याने त्याचे महत्व अधिकच मोठे आहे. या पुरस्कारामुळे माझ्यासारख्या कलाकाराला एकप्रकारचा हुरूप येतो,” असे उद्गार श्री स्वप्निल जोशी यांनी यावेळी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *