Sat. Nov 27th, 2021

संचारबंदीचा पहिला दिवस मुक्त संचारातच!

राज्यात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा पहिला दिवस मुक्त संचारातच गेल्याचे दिसून आले. संचारबंदी असतानाही ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांतील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून आली. निर्बंध जाहीर करताना राज्य सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली असल्याने नेमके अडवायचे कुणाला आणि कारवाई कुणावर करायची, असा प्रश्न पोलिसांनाही पडला, तर रेल्वेगाडय़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी असताना ठाणे स्थानकात सर्वच प्रवाशांना तिकिटे दिली जात होती. दोन आठवडय़ांच्या टाळेबंदीमुळे कल्याण, भिवंडी येथील एसटी स्थानकांत गावाकडे जाणाऱ्या गाडय़ांनाही गुरुवारी गर्दी दिसून आली.

राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी ठाणे शहरातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने बंद होती. असे असले तरी ढोकाळी, कळवा, विटावा, यशोधननगर, वागळे इस्टेट या वस्त्यांमध्ये नागरिकांचा संचार मात्र सुरू होता. अनेकजण विनाकारण बाहेर पडल्याचे चित्र होते. यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ई-पास देण्यात आला होता. यावर्षी तशी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने पोलिसांनाही नागरिकांना अडविताना संभ्रम निर्माण झाला. ठाणे बाजारपेठेतील इतर दुकाने बंद असली तरी येथील भाजी बाजार तसेच लसूण बाजार, मसाला बाजार, कांदा बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना तिकिटे दिली जात होती. याबाबत रेल्वे सुरक्षा दलातील एका कर्मचाऱ्याला विचारले असता, राज्य सरकारकडून अद्याप आम्हाला कोणतीही सूचना आली नसल्याचे त्याने सांगितले.

भिवंडी येथील तीन बत्ती भाजी बाजारामध्येही नागरिकांनी अशाचप्रकारे गर्दी केली होती. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रहिवाशांसाठी ही बाजारपेठ मुख्य असल्याने तसेच किरकोळ व्यापारीही या बाजारपेठेत खरेदीसाठी येत असल्याने भाजी खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. बदलापूर शहरात शासनाने मंजुरी दिलेली दुकानेच सुरू होती. रस्त्यांवर नागरिक मोठय़ा संख्येने बाहेर फिरताना दिसत होते. खाद्यपदार्थाच्या गाडय़ा, भाजी मंडई परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. अंबरनाथ शहरातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *