हिंदुस्तानचे पहिले हिंदकेसरी कालवश
श्रीपती खंचनाळे यांचं सोमवारी कोल्हापूरच्या रुग्णालयात वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन…

शशांक पाटील : रुस्तम ए हिंद, हिंदकेसरी, वस्ताद अशा अनेक किताबांनी नावाजलेले स्वतंत्र भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं सोमवारी कोल्हापूरच्या रुग्णालयात वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. हिंदकेसरी या भारतातील सर्वात मोठ्या कुस्तीची स्पर्धा सुरू झाल्याच्या प्रथम वर्षीच म्हणजेच १९५९ साली खंचनाळे यांनी विजयी किताब पटकावला होता.
महाराष्ट्राचे सुपुत्र खंचनाळे यांनी कुस्ती विश्वात आजवर अनोखी कामगिरी केलीये. दरम्यान खंचनाळे यांनी तरुणपणात कुस्त्यांचे फड गाजवत विविध स्पर्धा जिंकण्यापूर्ती आपली कारकिर्द न संपवता वृद्धापकाळात अनेक कुस्तीपटूंना तयार देखील केलं. त्यामुळे वस्ताद अशी उपाधी त्यांना मिळाली होती. महाराष्ट्राच्या सीमाभागात कर्नाटकजवळील एकसंबा या खेड्यात १० डिसेंबर १९३४ रोजी खंचनाळे यांचा जन्म झाला. बहुदा खंचनाळे यांचे पैलवान होणे विधीलिखीत असल्यानेच त्यांचा जन्म कुस्तीची पंढरी असणाऱ्या कोल्हापूरजवळ झाला होता. बालपणापासूनच कुस्तीचे धडे गिरवत आणि दमदार खुराक ठेवत खंचनाळे यांनी पैलवान बनण्याची तयारी सुरु केली.

धिप्पाड शरीर, बलाढ्य शरीरयष्टी, रुबाबदार व्यक्तिमत्त्व असे खंचनाळे आखाड्यात आल्यावर त्यांना पाहूनच प्रतिस्पर्धी मल्लाच्या उरात धडकी भरायची. बऱ्याच स्थानिक आणि राज्यस्तरीय कुस्त्यांमध्ये आपले कसब दाखवत खंचनाळे १९५९ साली दिल्लीला झालेल्या सर्वात पहिल्या हिंदकेसरीमध्ये पोहोचले. अंतिम सामन्यात प्रसिद्ध घुटना डावावर पंजाबच्या बंतासिंग यांना अस्मान दाखवत खंचनाळेंनी हिंदकेसरीचा किताब पटकावला होता. मात्र हा किताब इतक्या सहज त्यांना मिळाला नव्हता विजयाच्या एकदिवस आधी खंचनाळे आणि बतासिंग यांच्यात सुमारे २८ मिनिटे लढत होऊन कुस्ती बरोबरीत सुटली होती. मात्र कुस्तीसाठी जीवाचे रान केलेल्या खंचनाळे यांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची भेट घेत निकाली कुस्तीची मागणी केली आणि निकाली सामन्यात बंतासिंग यांना धोबीपछाड करत विजय मिळवला. अशारितीने पहिले हिंदकेसरी होण्याचा मान मिळवत खंचनाळेंनी कुस्तीची यशस्वी कारकीर्द सुरु केली. खंचनाळेंच्या या विजयामुळे महाराष्ट्र विशेषत: कोल्हापूर कुस्तीसाठी अखंड हिंदुस्तानात प्रसिद्ध झाले.

या विजयासाठी राष्ट्रपतींनी मानाची गदा तर पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मानाचा फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. हिंदकेसरीसोबतच खंचनाळे यांनी १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेली ऑल इंडिया चॅम्पिअनशीप देखील पटकावली होती. खंचनाळे हे सीमाभागातील असल्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांचे प्रेम त्यांना मिळालं होतं. त्यामुळच त्यांना महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार आणि कर्नाटक सरकारने ‘कर्नाटक भूषण’ पुरस्कार देऊन गौरवले होते. दरम्यान वयोमानानुसार आखाड्यात खेळण्यापासून जरी खंचनाळें दूर गेले होते तरी कुस्तीचा आखाडा त्यांना आपल्यापासून दूर ठेवू शकला नाही.

कोल्हापूरात शाहुपूरी तालीमच्या माध्यमातून खंचनाळे बालकांसह, तरुणांना कुस्तीचे धडे देऊ लागले. खंचनाळेंनी आपल्या कारकिर्दीत बरेच पैलवान घडवले. त्यांनी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्षपद देखील पाच वेळेस भूषवले होते. अशारीतीने आपली उभी कारकिर्द कुस्तीत घालवणाऱ्या पहाडासारख्या धिप्पाड खंचनाळेंची मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडली होती. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर सोमवारी सकाळच्या सुमारास या कुस्तीपटूने जगाचा निरोप घेतला. अवघ्या महाराष्ट्राच्या कुस्तीला अनाथ करुन खंचनाळे देवाघरी गेले. आज खंचनाळे जरी आपल्यात नसले तरी त्यांनी महाराष्ट्राला शिकवलेले कुस्तीचे डाव कायम स्मरणात राहतील…