Sat. Apr 4th, 2020

पुणे विभागात पूरपरिस्थितीमुळे 54 जणांचा मृत्यू, 8 हजारहून अधिक जनावरे बेपत्ता

पुणे विभागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 26, कोल्हापूर जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 8, पुणे जिल्ह्यातील 9 तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. चार नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. याशिवाय पुराच्या तडाख्यात आठ हजारहून अधिक जनावरे बेपत्ता आहेत.

यामध्ये गाय व म्हैस वर्गीय 7 हजार 847 जनावरे, 1 हजार 65 शेळ्या-मेंढ्या तर 166 लहान वासरे व गाढवांचा मृत्यू अथवा बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात अजूनही 8 बचाव पथके तैनात आहेत. अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुरस्थितीचा फटका

महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूराची स्थिती निवळली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. प्रशासनाच्यावतीने स्वच्छता, आरोग्य, मदत व पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू आहे. पुणे विभागातील 33 हजार 775 पुरग्रस्त कुटुंबांना अनुदानापोटी 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांच्या रोख रकमेचे वाटप करण्यात आले आहे.

पूरबाधित क्षेत्रातील पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून विभागात एकूण 1 हजार 169 घरांची पूर्णत: तर 18 हजार 533 घरांची अंशत: अशी मिळून 19 हजार 702 घरांची पडझड झाली आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकाव्दारे दिली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील बाधित कुटुंबांना 10 हजार तर शहरी कुटुंबांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. यापैकी 5 हजार रुपये रोख स्वरुपात बाधित कुटुंबाला वाटण्याचे काम सुरु असून उर्वरीत रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे.

आतापर्यंत पुणे विभागात 33 हजार 775 बाधित कुटुंबांना 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कमेचे वाटप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुणे विभागातील 23 हजार 889 कुटुंबांना गहू व तांदुळ प्रत्येकी 2388.9 क्विंटल तर 10 हजार 251 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *