कोल्हापूरात पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांनी घट, लाखोंचे स्थलांतर
पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांनी घट झाली असून एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांनी घट झाली असून एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अडकलेल्या 24 जणांना बाहेर काढण्यात आले. तसेच आंबेवाडीमधील 99 टक्के तर प्रयाग चिखली मधील 85 टक्के कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे.
कोल्हापूरची पुरस्थिती
पंचगंगेच्या पाणी पातळीत 2 फुटांनी घट झाली आहे. शिरोळ तालुक्यामध्ये 30 बोटी पाठविण्यात आल्या असून उद्या 151 शिबीरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. पाणी पातळी आणखी कमी झाल्यानंतर या गावांमध्ये हा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाणी ओसरल्यानंतर पडझड झालेल्या घरांचे, जनावरांचे पंचनामे करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. वीज जोडणी करणे, पाणी पुरवठा करणे, जनावरांना चारा पुरवठा करणे याचाही समावेश आहे.
आजअखेर 69 हजार लिटर पेट्रोल, 31 हजार लिटर डिझेलचा राखीव साठा करण्यात आला आहे. हा साठा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या वाहनांसाठी केला जात आहे. नागरिकांना इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आल्याच सांगण्यात येत आहे. दोन दिवसांमध्ये महामार्गावरील पाणी कमी झाल्यानंतर लागलीच इंधन पुरवठा करावा अशा सूचना देण्यात आल्याचंही स्पष्ट केलं आहे.
पाणी कमी न झाल्यास हवाई मार्गाने इंधन आणण्यात येईल त्याबाबत तसा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडर पुरवठ्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. महामार्ग सुरु झाल्यानंतर तात्काळ नागरिकांना उपलब्ध होतील असे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील मोबाईल सेवा कोलमडल्या आहेत त्याबाबतही कंपन्यांना पत्र दिले आहे. ते ही सुरळीत सुरु होईल. प्राथमिक माहितीनुसार 2 लाख घरांमध्ये विद्युत पुरवठाही बंद आहे. जवळपास 400 पाणी पुरवठा योजना बंद आहेत. याबाबतही सूचना देण्यात आल्या असून त्या ही पूर्ववत होतील. असं ही स्पष्ट केलंय