हवामानातील बदलांमुळे फुले महागली

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट होत असल्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सण-उत्सव साजरे करण्यासाठी सरकारने नियमावली आखली आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणात सजावटीसाठी फुलांच्या मागणीत वाढ होते. परंतु यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली आहे. यामध्ये फुलशेतींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. परतीच्या पावसामुळे फुलशेतींचे नुकसान झाल्यामुळे दिवाळीच्या तोंडावर फुलांच्या किंमतीत वाढ होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात झेंडूच्या फुलशेतीची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र, यावर्षी परतीच्या पावसामुळे तसेच हवामानात होणाऱ्या बदलांमुळे झेंडूच्या फुलावरती करपा सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सणउत्सवात झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. मात्र यंदा दिवाळीच्या तोंडावर झेंडू फुलांच्या किंमतीत वाढ होऊन नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
फुलावर झालेल्या करपा रोगामुळे झेंडू फुलांच्या उत्पादनात घट होताना दिसत आहे. फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फुले टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे यंदा दिवाळीमध्ये झेंडू फुलाला सर्वाधिक मागणी असून झेंडू फुलाच्या किंमतीत वाढ होणार आहे.