फुटबॉलचा देव हरपला…
हृदयविकाराच्या झटक्यानं डिएगो माराडोना यांचं निधन…

शशांक पाटील , जय महाराष्ट्र, मुंबई : फुटबॉल जितका जगप्रसिद्ध या खेळाचे खेळाडू तितकेच सुप्रसिद्ध. यातलं एक नाव, दिएगो मॅराडोना. दिएगो यांच २५ नोव्हेंबर २०२० रोजी,अर्जेंटिनातील राहत्या घरी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. बुधवारी रात्री १० च्या सुमारास ही बातमी येताच जगभरातील फुटबॉलप्रेमींनाच नव्हे तर क्रीडापटूंनाही धक्का बसला. साठ हे काही खेळाडूच्या जाण्याचं वय नाही आणि दिएगोच्या बाबत तर नाहीच नाही. ही सुद्धा मॅराडोना यांच्या कीर्तीची ओळख.
अर्जेंटिनाच्या लानुस इथे ३० ऑक्टोंबर १९६० रोजी एका सामान्य घरात जन्मलेला दिएगो एकदिवस फुटबॉल जगतावर राज्य करेल असं कोणालाच वाटलं नसेल. पण, नियतीने दिएगो यांचा जन्मच जणू फुटबॉल खेळण्यासाठी केला होता. रस्त्यावर मित्रमंडळींबरोबर फुटबॉल खेळणारा दिएगो अवघ्या १६ वर्षांचा असतानाच त्याचं फुटबॉल कौशल्य पाहून १९७६ साली अर्जेंटिना जूनिअर्स या व्यवसायिक संघाने त्याला विकत घेतलं.
जगभरात १० क्रमांकाची जादू फिरवणारे मॅराडोना तेव्हा मात्र १६ क्रमांकाची जर्सी घालून खेळायचे. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांतच दिएगोची निवड फिफा विश्वचषकासाठी अर्जेंटिनाच्या २० वर्षाखालील संघात झाली. स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत मॅराडोनाने कनिष्ठ गटातला विश्वचषक अर्जेंटीनाला मिळवून दिला. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनामधील बोका जूनिअर्स या संघाने त्याकाळात दिएगोला तब्बल ४ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम देत विकत घेतले होते. हा तेव्हाचा सर्वांत मोठा मेहनताना होता. त्यानंतर, १९८२ सालचा फिफा विश्वचषक मॅराडोनाचा पहिला विश्वचषक ठरला. यात दिएगोला चांगली सोबत न मिळाल्याने अर्जेंटीनाचा संघ काही खास कामगिरी करु शकला नाही. पण, मॅराडोनाचा खेळ पाहून प्रसिद्ध फुटबॉल क्लब बार्सिलोनाने तब्बल ५ मिलियन डॉलर्सचा करार करून तीन वर्षासाठी मॅराडोनाला करारबद्ध केले आणि बघता बघता साधा बांधा, केवळ ५ फुट ५ इंच इतकी उंची आणि कुरळे केस असा सर्वसामान्य वाटणारा मॅराडोना जागतिक फुटबॉलचा बेताज बादशाह झाला. त्यानंतर अनेक विक्रम आपल्या नावे करत मॅराडोनाने जागतिक फुटबॉलमध्ये आपले वेगळे नाव निर्माण केले.

बार्सिलोनाकडून अप्रतिम कामगिरी केल्यानंतर १९८६ च्या फिफा विश्वचषकात मॅराडोनाला अर्जेंटीना संघाचे कर्णधारपद दिले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटीना संघाने आपली छाप इतर संघावर सोडत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लडला २-१ च्या फरकाने नमवत उपांत्य फेरी गाठली. हा सामना विश्वचषकातील सर्वांत अटीतटीचा सामना होता, ज्यात अर्थात मॅराडोनानेच संघाची नौका पार लावत संघाला उपांत्य फेरी गाठून दिली. त्यानंतर बेल्जियमला २-० असं नमवत अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीच्या संघाला ३-२ ने मात दिली आणि विश्वचषक अर्जेंटीनाच्या नावे केला. त्यानंतर मॅराडोनाच्या वेगवान कारकिर्दीला ब्रेक लागला तो थेट १९९१ मध्ये. मॅराडोना ड्रग्स प्रकरणात अडकला आणि त्यामुळे त्याच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर एक काळ असाही आला की,जगातील या सर्वोत्कृष्ठ खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी कोणताच संघ तयार नव्हता. पुढे १९९५ साली मॅराडोनाला त्याचा मूळ क्लब बोका जूनिअर्सकडून खेळायचे संधी मिळाली. त्यानंतर, १९९७ साली मॅराडोनाने जागतिक फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. कारकिर्दीच्या या अप आणि डाऊनसह मॅरा़डोनाने मैदानावरून निवृत्ती घेतली.

दिएगो मॅराडोना २००८ साली भारतात देखील आला होता. कोलकत्यातील एका फुटबॉल अकादमीच्या उद्धघाटनाला आलेल्या मॅराडोनाच्या पायाचा ठसा उमटवून एक साचा तयार करून तो जपण्यात आलाय. अशा या फुटबॉलच्या देवाने २५ नोव्हेंबर, २०२० रोजी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि अवघा फुटबॉल जगच जणू पोरकं झालं. जागतिक फुटबॉलमधील सर्वात प्रसिद्ध, चार आंतरराष्ट्रीय विश्वचषक खेळलेला, एकट्याच्या जीवावर विश्वचषक जिंकून दिलेला, सर्वात पहिली विक्रमी ट्रान्सफर फी घेणारा मॅराडोना आता कधीच मैदानावर दिसणार नाही.