सलग दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी काल उपोषणाचे हत्यार उपसले. राज्यात अनेक ठिकाणी एसटी कर्माचाऱ्यांनी आंदोलन केले. एसटी कर्माचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील ७४१ फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. आणि आता सलग दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सांगलीतील सर्व एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. एसटी सेवा बंद करत सांगलीतील एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. येवल्यातही सलग दुसऱ्या दिवशी प्रलंबीत मांगण्यांसाठी एसटी कर्माचाऱ्यांचे उपोषण सुरूच आहे. वार्षिक वेतन वाढीचा दर ३ टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी येवल्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी एसटी सेवा बंद करत उपोषण केले.
मालेगावमध्येही दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये एसटी वाहतूक सेवा पूर्णत: बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. रायगडमध्येही एसटीसेवा बंद करत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी केली. दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पालघर, बोईसर, वसई, अर्नाळा, डहाणू बस आगारातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.