Jaimaharashtra news

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुंबईत दाखल

खंडणीप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. मात्र फरार घोषित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. तब्बल २३१ दिवसांनी परमबीर सिंह मुंबईत चौकशीसाठी हजर झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासात सहकार्य करण्यासाठी आलो असल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपासात स्वत: सहकार्य करतील, अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली होती.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याप्रकरणी चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. चांदीवाल आयोगाने यापूर्वीही परमबीर सिंग यांना हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांसमोर हजर न राहिलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले होते.

इतके दिवस बेपत्ता असलेले परमबीर सिंह आज मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नि. सहा.पो.आयुक्त शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी कसाबचा मोबाईल लपवला असून त्यांनी दहशतवाद्यांना मदत केली असल्याचा आरोप शमशेर पठाण यांनी केला आहे.

Exit mobile version