नवी दिल्लीचे माजी विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्रींचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीचे माजी विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्रींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात हा सोहळा पार पडला असून यावेळी योगानंद शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शरद पवारांनी स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘दिल्ली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन नाही. अनेक राज्यांमध्ये आमच्या पक्षाचे संघटन करण्याचे प्रयत्न करत आहोत. इथे आमच्यासोबत काम करणारे अनेक जण आहेत. मात्र देशाच्या राजधानीमध्ये पक्षाच्या सुधारणीसाठी आम्ही लोकांसोबत चर्चा करत ओहोत. गेल्या काही दिवसांपासून आमची शास्त्रीजींसोबत चर्चा सुरू होती की, दिल्लीतील संघटनाची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घ्यावी. त्यामुळे मला आता आनंद आहे की, त्यांनी आमच्या विनंतीचा स्वीकार केला. त्यांच्या सहकाऱ्यांनीसुद्धा राष्ट्रवादीसोबत काम करण्याची तयारी दाखवली त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून या सर्वांचे स्वागत करतो,’ असे शरद पवार म्हणाले.
योगानंद शास्त्री ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून दिल्लीतील यापूर्वीच्या शीला दीक्षित सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले आहे.