Fri. Oct 7th, 2022

चार साधूंना बेदम मारहाण

सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण झाल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरवरुन जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान चारही साधूंनी रात्रीच्या सुमारास लवंगा गावातील एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून पंढरपूर मार्गे निघाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला. मात्र, त्या तरुणाला हे साधू मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली.

याच संशयावरुन ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केली. साधू आणि ग्रामस्थांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली. सुदैवानं पालघर सारखी घटना होता-होता टळली आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर या साधूंकडे चौकशी केली असता,या साधूंच्याकडे मिळालेले आधार कार्ड आणि त्यानंतर संबंधित उत्तर प्रदेश मधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखडयाचे साधू असल्याचं समोर आलं आणि खरे साधू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या साधुनी मोठ्या मनाने ग्रामस्थांच्या विरोधात कोणतेही तक्रार नसून गैरसमजुरीतून हा प्रकार घडल्याचं पोलिसांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणी कोणाची ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नाही,अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी पंकज पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.